Smriti Irani Silly Souls : केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांच्या कथित मालकीचे हॉटेल आसगाव येथे आहे. या वादग्रस्त हॉटेलविरोधात टीसीपी अधिकाऱ्यांनी कारवाई करू नये, यासाठी त्यांच्यावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप आहे.
नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर बांधकामाविरोधात कारवाई करू नये, यासाठी सरकार त्यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केला आहे. गेला महिनाभर विविध कारणांसाठी हे हॉटेल आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी वादात आहेत.
आसगाव पंचायतीने या हॉटेलला बांधकाम परवाना दिलेला नाही. त्यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाल्यानंतर ॲड. रॉड्रिग्स यांनी पंचायत संचालकांकडे तक्रार नोंदवली होती. 28 जुलै रोजी त्यांनी आणखी एक तक्रार मुख्य नगरनियोजकांकडे नोंदवली आहे. भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या शेतात मातीचा भर घालून या हॉटेलचे बांधकाम करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले होते.
गेला महिनाभर स्मृती इराणींच्या कथित हॉटेल प्रकरणात ॲड. रॉड्रिग्स यांनी अक्षरश: मोहीम उभारली असून, काँग्रेस नेत्यांना जमले नाही, तेवढ्या तीव्रतेने ते हा विषय हाताळत आहेत. न्यायालयाने ज्या घाईघाईने या प्रकरणात निर्णय दिला, त्याबाबतही रॉड्रिग्स यांनी यापूर्वी नापसंती व्यक्त केली आहे. ॲड. रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरही या विषयावर भाष्य केले आहे. काँग्रेस पक्षाने बेकायदा हॉटेल प्रकरणात स्मृती इराणीने राजीनामा द्यावा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे.
टीसीपीचा हलगर्जीपणा
आयरिश रॉड्रिग्स यांच्या मते, त्यांच्या तक्रारीची टीसीपी खात्याने त्वरित दखल घेणे आवश्यक होते. पंचायतीची मान्यता नसताना बांधकाम कसे उभे झाले, शेतात भर घालण्यात आला व कच्चे बांधकाम उभे झाले, याबाबत टीसीपी खाते- जे अलीकडे राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात हात धुऊन लागले आहे. त्यांनी या प्रकरणात ताबडतोब कारवाई सुरू करणे आवश्यक होते. परंतु तक्रार करूनही गेले काही दिवस टीसीपीने हलगर्जी चालवली आहे आणि तक्रारीची दखल घेतली जात नाही, याबद्दल अॅड. रॉड्रिग्स उद्विग्न बनल्याचं चित्र आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.