पणजी, पणजी शहरामध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत जबाबदार कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करा.
ताडमाड - सांतिनेज येथे सध्या सुरू असलेल्या संरक्षक भिंतींसाठी केलेले सिमेंट काँक्रीटचे बांधकाम अचानक कोसळल्याने कामाचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याबरोबरच त्याची चौकशी करण्याची मागणीही गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
ताडमाड - सांतिनेज येथील रस्त्यालगत खंदक बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या ठिकाणी कोणत्याही आवश्यक सुलभ उपाययोजना न केल्याने तेथील काँक्रीट कोसळण्याचा प्रकार घडला आहे. कंत्राटदाराकडून करण्यात येत असलेले निकृष्ट कारागिरीचा व निष्काळजीपणाचा हा थेट परिणाम असल्याचे उघड झाले आहे.
हे खंदक अधिक कालावधीसाठी कोणत्याही कामाविना उघडे राहिल्याने तेथील रचना कमकुवत बनून आज सकाळी माती कोसळल्याने बाजूने केलेले सिमेंट काँक्रिटही कोसळले. गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदारांकडून कामाच्या दर्जाबाबत तक्रारी व निकृष्ट दर्जा उघडकीस आणून देऊनही कोणीच त्याची दखल घेत नाही.
या पत्राची दखल न घेतल्यास मुख्य सचिवांविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात येईल, कंत्राटदाराच्या या निष्काळजीपणामुळे खंदकाला लागून असलेल्या जुन्या वटवृक्षासह आजूबाजूच्या इमारतींना गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.
अधिवेशनात मुद्दा मांडणार!
हे खोदकाम करताना मलनिस्सारण वाहिनीसाठी एक मीटर खोल खोदकाम करण्याची आवश्यकता असताना ती अर्धा मीटरच खोदण्यात आली आहे. त्यामुळे योग्य ताराची देखभाल न केल्यामुळे हे मलनिस्सारणाच्या पाण्याचा प्रवाह उलट दिशेने होण्याची शक्यता आहे. आणखी असे प्रकार घडू नयेत व तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोका न पोचता आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. कंत्राटदारांकडून सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या व निष्काळजीपणाचा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करणार आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्षे देण्यासाठी हे पत्र पाठवत असल्याचे आमदार सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.