विलास ओहाळ
पणजी :
राजधानी पणजीतील आल्तिनो येथील झोपडपट्टीतील कोरोनाच्या १२ रुग्णांनी रुग्णालयात जाण्यास बुधवारी नकार दिला होता. त्यामुळे सुमारे अडीचशे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. आज सकाळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथील लोकांना समज दिल्यानंतर त्या रुग्णांनी रुग्णालयात जाण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे झोपडपट्टीतील इतर लोकांना दिलासा मिळाला. दुसरीकडे राज्यातील कोरोना स्थिती पाहता आज दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९१वर पोहोचली आहे. तर आज घेतलेल्या ३ हजार २३६ नमुन्यांच्या चाचणीअंती ५७० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. १,९२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ७४० जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.
राज्य आरोग्य संचालनालयाने जारी केलेल्या माहितीनुसार आज मडगावातील ईएसआय कोविड रुग्णालयात राजबाग-काणकोण येथील ४८ वर्षीय आणि आके येथील ७३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्याशिवाय २७१ जणांचे आरोग्य सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजार ४९४ वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४९१ वर पोहोचली आहे.
राजधानी पणजीतील कोरोनाची स्थिती भयावह होत चालली आहे. दिवसभरात २२ कोरोनाचे रुग्ण आढळले. सध्या पणजीतील रुग्णांची संख्या १६७ वर गेली असून, ती नागरिकांची चिंता वाढविणारी नक्कीच आहे. आल्तिनो येथील झोपडपट्टीतील १२ रुग्णांनी काल रुग्णालयात जाण्याचे टाळले होते, त्यामुळे आज सकाळी उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी, महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स आणि पोलिसांना घेऊन झोपडपट्टीत जाऊन रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी समज दिली. आयुक्त रॉड्रिग्स यांनीही येथील नागरिकांचे समुपदेशन केले. याशिवाय राजधानीत १३ ते २५ वयोगटातील विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळत असल्याने तिही चिंतेची बाब बनली आहे.
शंभरीपार रुग्णसंख्या असलेली ठिकाणे
वास्को ----४०७
मडगाव----३९०
कुठ्ठाळी ---२२०
चिंबल----१९५
पणजी----१६७
फोंडा----१७२
वाळपई ----१४२
पेडणे -----१२९
धारबांदोडा-----१३५
म्हापसा -----११४
पर्वरी -----११३
आयुष मंत्र्यांचे कार्यालय १७ पासून खुले
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचे पाटो येथील पर्यटन भवनातील कार्यालय १७ पासून खुले होणार आहे. कार्यालय आज पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मंत्री नाईक यांनी कोरोनाची बाधा झाल्याने घरातच आयसोलोशन होण्याचे ठरविले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्यांना कोरोनाची कोणतेही लक्षणे आढळलेली नाहीत. नाईक यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. पाटो येथील त्यांचे कार्यालय १६ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, सोमवारी (ता.१७) रोजी ते खुले करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
मार्केट आज दुपारपासून बंद
उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेचे मार्केट उद्या, शुक्रवारी दुपारी २ वाजता बंद केले जाणार आहे. अग्निशामक दलाच्या सहकार्याने इमारत पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
संपादन : महेश तांडेल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.