फोंडा
फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात कोरोनाची चाचणी करण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेतील दोन कर्मचारी कोरोनाबाधित ठरले आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून यंत्रणेचे कामही थंडावले असल्याने त्याचा परिणाम अहवाल निश्चितेवर झाला आहे. गेल्या आठवड्यातील अहवाल अजून यायचे आहेत. त्यामुळे हे अहवाल आल्यानंतर कोरोनाचे आकडे निश्चितच फुगलेले असतील, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक कोरोना रुग्ण एखाद्या भागात सापडल्यानंतर त्या भागाशी संबंधित व रुग्णाच्या कुटुंबियांची त्वरित कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात कोरोना तपासणी अपेक्षित गतीत होत नाही. कोरोना चाचणी घेतली, तरी अहवाल यायला आठवडाभर थांबावे लागत असल्याने पॉझिटिव्ह झालेली व्यक्ती इतरांच्या संपर्कात आल्याने रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
फोंड्यात सुरवातीला पोलिस स्थानक व नंतर वेर्णा औद्योगिक वसाहतीसह तिस्क - उसगावातील काही प्रकल्प कोरोनाचे वाहक ठरले आहेत. या औद्योगिक प्रकल्पांमुळेच फोंडा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. फोंडा शहर तसेच कुर्टी खांडेपार व तिस्क - उसगाव परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तिस्क उसगावातील सिद्धेश्वरनगर व अवंतीनगरात एकाच दिवसात सत्तावीसपेक्षा कोरोना रुग्ण सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. आता तीसपेक्षा जास्त रुग्ण या भागात असून शंभरपेक्षा जास्त जणांचे तपासणी अहवाल अजून अपेक्षित आहे, त्यामुळे आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
कुर्टीतील गंगानगर, सिंधुनगर भागातही कोरोना रुग्ण सापडल्याने हा परिसर कंटोनमेंट झोन जाहीर केला होता. मात्र, या भागातील कोरोना रुग्णांची संख्या तेवढी चिंताजनक नसल्याने कंटोनमेंट झोनमधून हा भाग वगळावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, फोंडा शहराबरोबरच तालुक्यातील इतर पंचायतीतही कोरोनाचा शिरकाव व्हायला सुरवात झाल्याने नजीकच्या काळात नेमके काय चित्र समोर येईल, ते सांगता येत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अजूनही लोक खरेदीसाठी गर्दी करीत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे फोंडा तसेच कुर्टी आदी भागातील बाजारावरून स्पष्ट होते. तिस्क - उसगावातील बाजारपेठ मात्र बंदच असून सोमवारी २७ रोजी बाजारपेठेसंबंधी पुढील निर्णय घेण्यात येईल.
आडपईत १४ कोरोना पॉझिटिव्ह
दुर्भाट आगापूर आडपई भागातील विशेषतः आडपई गावात १४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. गेल्या जिल्हा पंचायतीचा उमेदवारच कोरोनाबाधित झाल्याचे समजले आहे. सुरवातीला वास्कोतून आडपईत कोरोनाची लागण झाली होती. वास्को आरोग्य खात्यात काम करणाऱ्या आडपई येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह झाली होती. मात्र, आता हा आकडा वाढला आहे. ढवळीत आतापर्यंत बारा रुग्ण झाले आहेत.
पंडितवाडा - फोंड्यात ४ कोरोनाबाधित
फोंड्यातील पंडितवाड्यावर चार कोरोना रुग्ण सापडले आहेत. याशिवाय कुर्टीतील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत एक, दीपनगर भागात तिघे नव्याने कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. तिस्क - उसगाव येथील एमआरएफ कंपनीशी संबंधितही काही रुग्ण कुर्टीत सापडले आहेत. सरकारी यंत्रणेने बऱ्याच ठिकाणी जंतुनाशकाची फवारणी केली आहे. मात्र, कोरोनाच्या चाचण्या थंडावल्या आहेत.