पणजी: रविवारी मध्यरात्रीपासून ते आजपर्यंत राज्यात (Goa) एकामोगामाग बांबोळी, हडफडे, केरी, आगोंद व होंडा या पाच विविध ठिकाणी अपघात (Accident) घडण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी चार अपघातांमध्ये एका पोलिसासह पाचजणांचा मृत्यू झाला आहे. बांबोळी व हडफडे येथे मोठे भीषण अपघात झाले. त्यामुळे सोमवार हा घातवार दिवस ठरला.
आणि त्यांचा साखरपुडा राहिला!
रात्री उशिरापर्यंत पार्टी करून आलेल्या पुण्याच्या (Pune) दोघांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाल्याची घटना घडली. बागा-कळंगुट(Calangute) येथील खाडीत सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पर्यटक कार कोसळल्याने शुभम नितीन देडगे (28) आणि अभिनेत्री ईश्वरी देशपांडे यांचा मृत्यू झाला. शुभम आणि ईश्वरी गाडीच्या सेंट्रल लॉकमुळे गाडीतच अडकले होते. त्यांच्या नाकातोंडात पाणी घुसले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या हणजूण पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गाडीत अडकून पडलेल्या शुभम तसेच ईश्वरी देशपांडे यांना प्राथमिक उपचारासाठी प्रयत्न केले होते मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पिळर्ण अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खाडीत बुडालेल्या गाडीसहित मृतदेह बाहेर काढले.
शुभम देडगे आणी ईश्वरी देशपांडे बुधवारी सकाळी पुण्यातील आपल्या निवासस्थानाकडून गोव्यात येण्यासाठी बाहेर पडले होते. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी सरळ जवळच्या खाडीत कोसळली.
नव्या गाडीच्या नशेमुळे तरुणाचा बळी : चालक गंभीर
नवीन गाडीची नशा पर्वरी येथील तिघा तरुणांना काल रात्री साडेदहाच्या सुमारास बांबोळी येथे अपघात होऊन नडली. भरधाव वेगाने आलिशान गाडी चालवल्याने चालकाचे वळणावर त्यावरील नियंत्रण गेले. गाडीने खांब्याला ठोकर देत एका दुचाकीलाही जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गाडीतील विरल मेहता (26) हा जागीच ठार झाला. चालक अरुण राय याची प्रकृती गंभीर आहे तर दुचाकीजवळ असलेल्या एक महिलेचे पाय फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाहतूक पोलिस ठार
बाबऱ्यार-केरी येथे आज दुपारी 1.15 वाजता झालेल्या कार अपघातात पेडणे वाहतूक कार्यालयातील सहाय्यक उपनिरीक्षक नरेश नार्वेकर (वय 53) यांचा मृत्यू झाला. नरेश नार्वेकर हे आपल्या कारने केरी येथील घरी जात असता बाबऱ्यार येथे समाेरून येणाऱ्या जीपने धडक दिली. यात त्यांची कार पलटी घेऊन परत उभी झाली.
काणकोणात पोलिसाचा मृत्यू
काणकोण तालुक्यातील मनमिळाऊ पोलिस हवालदार संदेश भगत (52) यांचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारादरम्यान सोमवारी सकाळी 5.30 वाजता त्यांचे निधन झाले. गेली अनेक वर्षे संदेश भगत हे काणकोण पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून अगदी उत्तमरित्या जबाबदारी सांभाळत होते.
होंडा जंक्शनवरही अपघात
वाळपई होंडा येथील जंक्शनवर ट्रकला विद्युतभारीत वीजतारा अडकल्या होत्या मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. टेम्पो आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला. कुणाच्या चुकीमुळे अपघात झाला हे मात्र समजू शकले नाही. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.