Canacona: काणकोणची भिस्त किनारी पर्यटनावर; पावसाळ्‍यातही पर्यटकांच्‍या संख्‍येत लक्षणीय वाढ

कोरोनामुळे सलग तीन वर्षे काणकोणचे किनारी पर्यटन डळमळीत अवस्थेत होते
Tourist
TouristDainik Gomantak

Goa Tourist In Canacona: काणकोणचे अर्थकारण सध्‍या तरी किनारी पर्यटनावर अवलंबून आहे. या किनारी भागातील लोकांना पर्यटन व्यवसायाने चांगला आर्थिक मदतीचा हात दिला आहे. कोविड महामारीनंतर यंदा पर्यटन व्यवसायाला बरकत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पावसाळा असूनही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात देशी पर्यटक मोठ्या संख्येने काणकोणमधील किनाऱ्यांवर दाखल होत आहेत. शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवसात त्‍यांच्‍या संख्‍येत लक्षणीय वाढ होत आहे.

कोरोनामुळे गेली सलग तीन वर्षे काणकोणचे किनारी पर्यटन डळमळीत अवस्थेत होते. काणकोणात आगोंद, पाळोळे, पाटणे, राजबाग, तळपण व पोळे या किनाऱ्यावर पर्यटन व्यवसाय चालतो.

गालजीबाग किनारा सागरी कासवासाठी आरक्षित असल्याने तेथे पर्यटन व्यवसायाला बंदी आहे. अन्य किनाऱ्यांवरील पर्यटन व्यावसायिकांवर गेली तीन वर्षे कोरोनामुळे टांगती तलवार होती.

सीआरझेडएमए व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ससेमिरा या व्यावसायिकांच्या पाठीमागे आहे. पर्यटन खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य खाते, किनारी नियंत्रण विभाग प्राधिकरणाचा परवाना मिळाल्याशिवाय पर्यटन खाते पर्यटन व्यवसायाला परवानगी देत नाही.

तसेच पंचायत किंवा पालिका पर्यटन व्यवसायाला अंतिम परवानगी देऊ शकत नाही. मागील काही वर्षांत देशात झालेले बाँबस्फोट, विदेशी महिलांवरील बलात्कार आदी प्रकरणांमुळे काही परदेशी पर्यटकांनी काणकोणच्या किनाऱ्यांकडे पाठ फिरवली होती.

Tourist
Goa News: ‘फलोत्पादन’ने काकडी फेकल्याची अफवाच

पार्किंग व्‍यवस्‍था सुधारावी

आता पावसाळ्यातही पाळोळे व अन्य किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पाळोळे किनाऱ्यावर पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

पालिकेच्‍या मालकीच्या पाळोळे येथील वाहनतळावर एकावेळी पन्नास चारचाकी वाहने पार्क करता येतात. मात्र त्यापेक्षा जास्त वाहने आल्यास किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे काणकोण टेलिफोन एक्सचेंज इमारतीजवळ खासगी जागेत वाहने पार्क करण्यात येतात.

पाळोळेतील वाहनतळ अपुरा पडत असल्याने किनाऱ्याजवळ जागा संपादित करून नवीन वाहनतळाची सोय करण्याची मागणी करण्यात येत आहे.

माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांच्या कारकिर्दीत पाळोळे येथे मल्टी स्टोरी पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र सध्‍या हा प्रस्ताव शीतपेटीत पडला आहे. पाळोळेत वाढती पर्यटकांची संख्या पाहता सध्‍या तेथे पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे.

"गोव्‍यात ऑक्टोबरपासून किनारी पर्यटन सुरू होते. यंदा पावसाळ्यातही पाळोळे किनाऱ्यावर देशी पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळाली. एरवी इस्रायली पर्यटक यायचे, मात्र त्यांचे प्रमाण यंदा कमी आहे. खरे म्हणजे किनारी पर्यटनाची संकल्पना बदलून ती ‘ऑल सिझन’ अशी व्हायला हवी, तेव्हाच किनारी पर्यटन राज्यात फोफावेल."

- दयानंद पागी, पर्यटन व्‍यावसायिक तथा काणकोणचे माजी उपनगराध्यक्ष

"किनारी पर्यटन व्यवसाय कायद्याच्या चौकटीत राहून चालविण्यासाठी काणकोण नगरपालिकेसह सर्वच सरकारी यंत्रणांनी सहकार्य करण्‍याची गरज आहे. पर्यटन व्यावसायिक वेगवेगळ्या प्रकारे सरकारच्‍या तिजोरीत महसुलाचा भरणा करतात. मात्र त्या मानाने सेवा कमीच मिळते. सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा."

- पंकज नाईक गावकर, शॅक्‍समालक संघटनेचे पदाधिकारी

Tourist
Goa Police: पणजी महिला पोलिस स्थानकात बदली अधिकारी मिळेना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com