National Games Goa 2023: योगासनात शुभम देबनाथला सुवर्ण; पुरुषांच्या पारंपरिक प्रकारात अव्वल कामगिरी

हरियानाच्या योगपटूच्या नावे ६३ गुण नोंदीत झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
National Games Goa 2023
National Games Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

National Games Goa 2023: पुरुषांच्या पारंपरिक योगासनात शुभम देबनाथ याने जिंकलेल्या सुवर्णासह गोव्याने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी पदकांचे अर्धशतक नोंदविले. यजमानांनी आता १२ सुवर्ण, १२ रौप्य व २६ ब्राँझसह एकूण ५० पदके जिंकून पदकतक्त्यात अकरावा क्रमांक प्राप्त केला आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात योगासनात गोव्यासाठी पहिले पदक जिंकण्याचा मान शुभमने प्राप्त केला. योगासन स्पर्धा कांपाल येथे सुरू आहे. त्याने अव्वल क्रमांक मिळविताना ६३.६७ गुण नोंदविले. त्याच्यासमोर अभिषेक सिंग याचे आव्हान होते, परंतु हरियानाच्या योगपटूच्या नावे ६३ गुण नोंदीत झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

६२.९२ गुणांसह कर्नाटकच्या महंमद शेख याला ब्राँझपदक मिळाले. पारंपरिक योगासनात स्पर्धकाला १० योगासने सादर करावी लागतात आणि किमान तीस सेंकद आसनस्थ राहावे लागते.

मूळ पश्चिम बंगालचा योगपटू

गोव्यासाठी योगासनात पहिले सुवर्णपदक जिंकलेले शुभम देबनाथ हा मूळ पश्चिम बंगालमधील आहे. योग विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचा तो विद्यार्थी असून गोव्यातर्फे तीस टक्के बाहेरगावी खेळाडू निवडीच्या धोरणानुसार खेळला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे तो आनंदित असून गोव्यात योगासनाच्या साधन सुविधा आवश्यक असल्याचे मत त्याने व्यक्त केले. सुविधा तयार झाल्यास राज्यात योगपटू चांगले तयार होतील, असे त्याला वाटते.

‘‘योगासनात प्रात्यक्षिकांसमवेत शास्त्रीय माहितीही महत्त्वाची ठरते. त्यामुळेच मी योगविद्येत पदवी शिक्षण घेत आहे. योगविद्येत पारंगत होत असताना प्रशिक्षक स्वप्ना पॉल, भाऊ, आई-वडील यांचे भरपूर प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळत आहे. गोव्याकडून राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना मी सुवर्णपदक जिंकण्याचे आश्वासन आईला दिले होते, त्यामुळे ती आज खूप खूष असेल याचा मला पूर्ण विश्वास आहे,’’ असे तो म्हणाला.

गतवर्षी जिंकले होते रौप्यपदक

गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुभमने पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व केले व तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. यंदा गोव्यातर्फे खेळण्याविषयी त्याने सांगितले, की ‘‘गतवर्षी मी पश्चिम बंगालतर्फे रौप्यपदक जिंकले, परंतु यंदा परीक्षांमुळे तेथील राज्यस्तरीय स्पर्धेत खेळू शकलो नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली नाही. गोव्याकडून खेळण्याची विचारणा झाली आणि सुवर्णपदकाचे लक्ष्य बाळगून मी नऊ महिन्यांपासून गोव्यातील योग संघटनेशी बांधील आहे.

स्पर्धेपूर्वी एक महिना आम्ही खूप परिश्रम घेतले. सुवर्णपदकाचे स्वप्न साकार झाल्याने मी खूप आनंदित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ भारतात ऑलिंपिक स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, त्यामुळे देशात ही स्पर्धा झाल्यास ऑलिंपिकचा समावेशही ऑलिंपिकमध्ये होईल आणि त्या पातळीवर जाण्याचे लक्ष्य मी बाळगले आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com