Mahadayi Water: म्हादई नदीचा प्रश्न गेली काही वर्षे सातत्याने उफाळून येत आहे, पण मी कधीही त्यावर प्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आता यात लक्ष घालावे लागत आहे. कर्नाटकातील सर्व पक्षातील आणि विविध क्षेत्रातील नेते, समाजकारणी, पर्यावरणवादी आणि जनता यांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात.
आम्ही कर्नाटक आणि कर्नाटकातील जनतेला परके मानत नाही. त्यामुळे या प्रश्नांवर त्यांनी एकत्र बसून चिंतन करावे, अशी अपेक्षा केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम कर्नाटकात पुरेसा पाऊस पडत असतानाही आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या नद्यांद्वारे पुरेसा पाणीपुरवठा होत असतानाही इतक्या वर्षांत किती प्रमाणात पडिक जमिनीत वृक्ष लागवड करून भूअंतर्गत जलसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केला?
बेळगाव, धारवाड, हुबळी आदी भागात जंगले वाढवण्यासाठी किती प्रयत्न केले गेले? जर केले गेले असतील, तर त्यात अजून किती वाढ करायला हवी यासाठी अभ्यासपूर्ण सर्वेक्षण केले गेले का? आणि त्यावर कोणती कार्यवाही केली गेली? कर्नाटकात पर्यावरणवादींची कमतरता असेल तर गोव्यातील पर्यावरणप्रेमींची त्यांनी मदत घ्यावी, अशी माझी विनंती आहे.
...तर कन्नडिगांच्याही तोंडचे पाणी पळेल
नद्यांद्वारे मिळणारे पाणी आणि भूअंतर्गत जलसाठा यांचे अतिरिक्त शोषण करणारे थंड पेय, मद्यनिर्मिती असे प्रमाणाबाहेर औद्योगिक प्रकल्प कर्नाटकात आहेत का? असतील तर कर्नाटकाला कितीही पाणी मिळाले तरी तेथील जनता तहानलेलीच राहील.
याबाबतही त्यांनी सर्वेक्षण करावे. गोव्यातील मूळ रहिवाशी सोडा, गोव्यामध्ये असंख्य कन्नडिग बांधव गेली दोन-तीन पिढ्या गुण्यागोविंदाने राहात आहेत. म्हादई कोरडी पडली तर या बांधवांच्या सुद्धा तोंडचे पाणी पळेल, असेही श्रीपाद नाईक म्हणतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.