Shripad Naik : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिनी झालेल्या दोना पावला जेटीच्या उद्घाटनाला निमंत्रण न दिल्याने तसेच कार्यक्रम पत्रिकेत साधा उल्लेखही नसल्याने पर्यटन राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी उघडपणे संताप व्यक्त केला आहे.
‘खासदाराला निमंत्रण न देणे हे शिष्टाचाराच्या कोणत्या तत्वात बसते’, असा सवाल करीत या प्रकरणी मुख्यमंत्री सावंत व पर्यटनमंत्री खंवटे यांनी लक्ष घालावे, असे ते म्हणाले. मंत्री खंवटे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिनी पर्यटन खात्याने शनिवारी दोना पावला जेटी पर्यटकांसाठी खुली केली. या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, ताळगावच्या आमदार जेनिफर, महापौर रोहित यांना निमंत्रण असूनही ते उपस्थित नव्हते. या गोष्टीची चांगलीच चर्चा झाली.
बाबूश हे आजारी असल्याने आले नाहीत. रोहित हे मुंबईला आहेत; तर जेनिफर यांनीही वैयक्तिक व्यस्ततेचे कारण दिले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना न बोलविल्याने त्यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे. एरवी संयत भूमिका घेणारे भाऊ आक्रमक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पर्यटनमंत्र्यांची चुप्पी; बहुजनांचा अवमान : आप
शासकीय प्रोटोकॉलनुसार राज्य सरकारच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना स्थानिक खासदाराला निमंत्रण दिले जाते. दोना पावला जेटीचे नूतनीकरण हे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या खात्यामार्फतच झाले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला नाईक यांना आमंत्रित करणे अगत्याचे होते.
मात्र, पर्यटन खाते आणि ‘जीटीडीसी’ यांनी या कार्यक्रमामधून केंद्रीय मंत्र्यांनाच का वगळले, हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. विशेष म्हणजे पर्यटनमंत्री खंवटे यांनी मौन बाळगणे पसंत केले आहे. यावरून राज्य सरकार श्रीपाद नाईक यांना जुमानत नसल्याचे दिसते.
केंद्रीय पर्यटन खात्यातर्फे ‘स्वदेश दर्शन’ योजनेंतर्गत दोना पावला जेटीचे सुशोभीकरण करण्यात आले. केंद्र सरकारने जर या प्रकल्पाला निधी दिला असेल तर केंद्राचा प्रतिनिधी उपस्थित असायलाच हवा! मी गोव्यात असो किंवा नसो; परंतु आपणास निमंत्रण का दिले नाही? मुख्यमंत्र्यांनी व पर्यटनमंत्र्यांनी यात लक्ष घालावे.
- श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री
यापूर्वीही दुर्लक्ष
झुआरी पुलाच्या उद्घाटनप्रसंगीही नाईक यांना योग्य सन्मान न दिल्याच्या कारणावरून नाराजी नाट्य झाले होते. यापूर्वी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यातही त्यांना यथोचित मान देण्यात आला नव्हता.
नाईक यांच्याकडे राज्य सरकार किंबहुना भाजपकडून कानाडोळा करण्याचा प्रकार सुरू आहे काय? अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.
केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना जेटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न देणे हा गोव्यातील समस्त बहुजन समाजाचा अवमान आहे. काहींना साध्या कार्यक्रमांचेही आमंत्रण दिले जाते, परंतु नाईक यांना अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाला डावलले जाते. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाऊंचे तिकीट कापले जाईल!
- अमित पालेकर, नेते, आप
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.