
पणजी: सहाजणांचा जीव घेणाऱ्या जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीस श्री देवी लईराई देवस्थान समितीही जबाबदार असल्याचे सत्यशोधन समितीने नमूद केल्याचे तीव्र पडसाद शिरगावात उमटले आहेत. ग्रामस्थांनी बैठक घेऊन काहींना यातून वाचवण्याच्या सरकारी प्रयत्नांना कायदेशीर विरोध करण्याचे ठरविले आहे.
खात्रीलायकरित्या मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत माहिती हक्काद्वारे पोलिस बंदोबस्ताची माहिती मागण्याचे ठरविण्यात आले आहे. अहवालात स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या अपयशाकडे दुर्लक्ष करून संपूर्ण दोष देवस्थान समितीवर ढकलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बैठकीत सर्वानुमते माहिती अधिकार कायद्यानुसार जत्रोत्सवात नेमलेल्या पोलिस बंदोबस्ताची सविस्तर माहिती मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘कोणत्या स्तरावरील अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष नेमणूक झाली होती, किती पोलिस उपस्थित होते आणि गर्दी नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना राबवली होती’’ याबाबतचा तपशील मागवण्यात येणार आहेत.
ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले की, देवस्थान समितीवर दोष टाकून मामलेदार आणि पोलिस प्रशासनाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘महाजनी कायद्यानुसार मामलेदार हेच देवस्थानचे प्रमुख मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भूमिका तपासल्या गेल्या पाहिजेत’’ असे मत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी न्याय आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जबाबदार यंत्रणांवर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचा सूर बैठकीत उमटला. ग्रामस्थांनी कोर्टात धाव घेण्याचा विचारही मांडला असून, गरज भासल्यास न्यायालयीन लढाही दिला जाईल, असे बैठकीनंतर सांगण्यात आले.
शिरगावमधील चेंगराचेंगरीबाबत सरकारने तयार केलेला अहवाल संशयास्पद असून, दुर्घटनेला देवस्थान समितीला जबाबदार धरले आहे. मात्र, हा अहवाल चुकीचा आहे, असा दावा श्री लईराई देवस्थान समितीने केला आहे. अहवालात देवस्थान समितीवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती समाज माध्यमावरून व्हायरल होत आहे. त्या माहितीच्या अनुषंगाने देवस्थान समितीचे मुखत्यार दयानंद गावकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी अहवालातील ठपका फेटाळून लावला आहे.
शिरगाव जत्रेवेळी झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सहा भक्तांचे बळी गेले आहेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने सत्यशोधन समिती नियुक्त केली. या समितीने अहवाल तयार करून सरकारला सादर केला आहे. या अहवालाची प्रत अजून देवस्थान समितीला मिळालेली नाही. मात्र, देवस्थान समितीने प्रशासनाला सहकार्य केलेले नाही, असा ठपका अहवालात ठेवला आहे.
हा ठपका आणि अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे, असा दावा देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केला आहे. जत्रेवेळी देवस्थान समितीने प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले असून, देवस्थान समितीवर चुकीचा ठपका ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अहवाल मिळाल्यानंतर महाजनांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येईल. तूर्त सरकारने नियुक्त केलेल्या समितीने तयार केलेला अहवाल चुकीचा आहे, असे देवस्थान समितीने म्हटले आहे.
श्री लईराई देवस्थान समितीने केलेल्या आवाहनाला अनुसरून नोंदणी करण्यासाठी धोंड भक्तगण पुढे येऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून धोंड भक्तगण स्वतः शिरगाव येथे देवस्थानच्या कार्यालयात येऊन नोंदणीचे सोपस्कार पूर्ण करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.