Lairai Jatrotsav: ‘धोंड’ तळीवर भाविकांची गर्दी! लईराईच्या दर्शनासाठी गजबजाट; शनिवारपासून 4 दिवस कौलोत्सव

Lairai Jatrotsav Shirgao: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीची जत्रा जवळ आल्याने संपूर्ण शिरगाव गावात सध्या उत्साहाचे, मंगलमय वातावरण पसरले आहे.
Shri Lairai Temple Shirgao
Shri Lairai TempleDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीची जत्रा जवळ आल्याने संपूर्ण शिरगाव गावात सध्या उत्साहाचे, मंगलमय वातावरण पसरले आहे. जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जत्रा सुरळीत पार पडावी यासाठी देवस्थान समितीसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज बनली आहे.

दरम्यान, लईराई देवीच्‍या दर्शनासाठी आतापासूनच भक्तांची पावले शिरगावकडे वळू लागली आहेत. आज मंगळवारी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येत्या शुक्रवारी २ मे रोजी ही जत्रा साजरी होणार असून शनिवारपासून चार दिवस कौलोत्सव होणार आहे.

श्री लईराई देवीची जत्रा दोन दिवसांवर आल्याने तयारी जोरात सुरू असून, बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मंदिरासह घरोघरी सजावटीची कामे सुरू आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. अग्निशमन दल, आरोग्य आदी आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्यात येणार असल्‍याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि पदाधिकाऱ्यांनी दिली.

‘धोंड’ तळीवर गजबजाट

जत्रेच्या पार्श्वभूमीवर शिरगावमधील ‘धोंड’ अर्थातच देवीच्या तळीवर आंघोळीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. कडक आणि सोवळे व्रत पाळलेले शिरगावसह अन्य भागातील श्री लईराई देवीचे धोंड भक्तगण या पवित्र तळीत शूर्चिभूत होत आहेत. निर्मळ झाल्यानंतर हे धोंड भक्तगण देवीचे दर्शन घेऊन आपापल्या धोंड तळावर जात असतात. सकाळपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ते या तळीवर आंघोळ करताना दिसून येतात.

मये, मुळगावात ८० धोंड भक्तगण पाळताहेत ‘व्रत’

येथील सर्वत्र धोंड तळांवर धोंड भक्तगणांकडून कडक सोवळे व्रत पाळण्यास सुरवात झाली आहे. मयेसह मुळगाव आदी भागातही धोंड भक्तगण ‘सोवळे’ व्रत पाळत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने काही ठिकाणी महिला धोंड भक्तगणही व्रतस्‍थ बनल्‍या आहेत. प्रत्येक धोंड तळावर सध्या श्री लईराई देवीचा जयघोष कानी पडत आहे.

शिवोलकरवाडा-मुळगाव येथे ४५ धोंड भक्तगण एकत्रितपणे देवीचे व्रत पाळत आहेत. वाड्यावरील विहिरीजवळ तळ उभारून हे धोंड व्रत पाळत असून, विहिरीवर पंप बसवून स्नान करून फराळ ग्रहण करतात. फराळ बनविण्यासाठी या धोंड भक्तगणांना काही महिला मदत करत आहेत. धोंड भक्तगणांबरोबर या महिलाही ‘सोवळ्या’ राहतात. गेल्या ३२ वर्षांपासून आम्ही एकत्रितपणे व्रत पाळत आहोत, असे ६३ वर्षीय ज्येष्ठ धोंड भक्तगण सोनू शिरोडकर यांनी सांगितले.

महिला धोंडसुद्धा पाळतात ‘सोवळे’

महत्त्‍वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मये तलावाकाठच्या श्री तळ्याकार देवस्थानात जवळपास ३५ धोंड भक्तगण श्री लईराई देवीचे व्रत पाळत आहेत. या धोंड भक्तगणांमध्ये मयेसह डिचोलीतील भक्तगणांचा समावेश आहे. काही महिला धोंड भक्तगण पुरुष भक्तगणांबरोबर एकत्रितपणे व्रत करत आहेत. त्‍यांनीही ‘सोवळे’ पाळले आहे, अशी माहिती या तळावर व्रत पाळणारे शेखर नाईक यांनी दिली.

Shri Lairai Temple Jatrotsav
Shri Lairai Temple JatrotsavDainik Gomantak

धोंड तळावर ५० हजार नामजप

सत्तरी तालुक्यातही आज सोमवारपासून श्री लईराई देवीच्‍या धोंडांचे व्रत विविध तळांवर सुरू झाले. त्‍यांच्‍यासोबत सुप्रसिद्ध कीर्तनकार सुहासबुवा वझे यांनी पाडेली-भोम येथे पन्नास हजार सामूहिक नाम:स्मरण जप केले. हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम वझेबुवा १८ वर्षांपासून राबवत आहेत.

भारतीय संस्‍कृतीचे जतन, संरक्षण व प्रबोधन होणे फार गरजेचे आहे. धोंडांना भक्तींचे, नाम:स्मरणाचे, जपाचे महत्त्‍व कळावे हाच आपला उद्देश आहे, असे सुहासबुवा वझे म्‍हणाले. देव, देश, धर्म संस्‍कृतीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी, कर्तव्य आहे. त्याचे भान ठेवूनच लोकांनी कार्यरत राहिले पाहिजे. समाजात एकता निर्माण व्हावी, सर्वजण एकत्र नांदावेत, हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार झाला पाहिजे. एकमेकांना मदत करून सत्कार्य केले पाहिजे, असेही ते म्‍हणाले. प्रारंभी पाडेली येथे सुनील नाईक यांनी स्वागत केले. शेवटी बाबाजी गावडे यांनी आभार मानले.

Shri Lairai Temple Shirgao
Lairai Jatrotsav: लईराई जत्रेत यंदा मोगरीचा तुटवडा? भाव वाढण्याची शक्यता

७५ धोंडांचे उपवास व्रत सुरू

शिरगाव येथील श्री लईराई देवीचा सुप्रसिद्ध जत्रोत्सव शुक्रवारी २ मे रोजी साजरा होत आहे. त्‍यानिमित्त सावईवेरे गावातील सुमारे ७५ धोंड भाविकांनी सोमवारपासून देवीचे धोंड व्रत स्वीकारून उपवास सुरू केला आहे. सावईवेरे येथील श्री सातेरी देवस्थानच्या प्रांगणात सुमारे ८० वर्षांची देवीचे सामूहिक व्रत पाळण्याची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.

या धोंड गणांमध्ये अगदी १२ वर्षांपासून ते ८० वर्षे वयोगटातील धोंडांचा समावेश आहे. नऊ महिलांनीही व्रत जोपासले आहे. चार नवीन धोंडांचा समावेश आहे. धोंड मंडळींनी सोमवारपासून सामूहिक व्रताला प्रारंभ केला आहे. हे पाच दिवस सावईवेरे गावात भक्तिमय वातावरण असते. गुरुवारी १ मे रोजी धोंडांचे ‘व्हडले जेवण’ होणार आहे.

Shri Lairai Temple Shirgao
Shri Lairai Jatrotsav: 1 कोटींची आर्थिक उलाढाल अपेक्षित! लईराईच्या जत्रोत्सव तयारीला वेग, धोंड ‘तळ’ फुलले

दरवर्षी येथील श्री सातेरी देवस्थानच्या प्राकारात मंडप उभारून चार दिवस जेवणादी कार्यक्रम पार पाडले जातात. सावईवेरे येथील गुरुदास कडेकर हे गेली अनेक वर्षे धोंड भक्तांच्या आंघोळीसाठी तसेच जेवणादी कार्यक्रमासाठी मोफत पाण्याची व्यवस्थाही करत आहेत. जत्रोत्सवापूर्वी महिनाभर म्हणजे गुढीपाडव्यापासून लईराईचे धोंड हे व्रत पाळत असतात. जत्रोत्सवापूर्वी चार दिवस हे व्रत अत्यंत कडक स्वरूपाचे असते. खाण्या- जेवण्यापूर्वी आंघोळ करतात व ओल्यानीच जेवणादी कार्यक्रम उरकतात. अनवाणी कुठेही फिरत नाहीत.

श्री लईराई देवीची जत्रा देश-विदेशात प्रसिद्ध असल्याने जत्रेदिवशी शिरगावात धोंडांसह भक्तगणांचा महापूर लोटत असतो. या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. देवीच्या धोंड भक्तगणांसह जत्रेला येणाऱ्या भाविकांनी जत्रा सुरळीतपणे साजरी व्हावी यासाठी सहकार्य करावे. सध्या शिरगावात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता जत्रोत्‍सवाच्‍या काळात भाविकांचा सागर लोटणार आहे हे निश्चित.

दीनानाथ गावकर, अध्यक्ष, श्री देवी लईराई देवस्थान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com