Bodgeshwar Jatra 2024: भक्तांच्या हाकेला धावणारा 'श्री बोडगेश्वर'

Bodgeshwar Jatra 2024: गोमंतकियांचे श्रद्धास्थान म्हणजे म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर. डिसेंबर महिना संपत आला, की बोडगेश्‍वराच्या जत्रेचे प्रत्येकाला वेध लागतात. श्री देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सवाला यंदा 23 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.
Bodgeshwar Jatra 2024
Bodgeshwar Jatra 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Bodgeshwar Jatra 2024: गोमंतकियांचे श्रद्धास्थान म्हणजे म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर. डिसेंबर महिना संपत आला, की बोडगेश्‍वराच्या जत्रेचे प्रत्येकाला वेध लागतात. श्री देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सवाला यंदा 23 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.

Bodgeshwar Jatra 2024
Crime In Goa: गोव्यातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती

बोडगेश्वर देव हे तर भक्तांच्या हाकेला धावणारे जागृत दैवत. प्रत्येक रविवारी व बुधवारी अनेक भक्त श्री देव बोडगेश्वराच्या मंदिरात जातात. तेथे आपल्या समस्या गाऱ्हाण्यांद्वारे देवाकडे मांडतात आणि काम व्हावे म्हणून देवाला नवस बोलतात.

काम झाल्यानंतर तितक्याच तत्परतेने पुढच्या रविवारी किंवा बुधवारी नवस फेडण्यासाठी लोक येतात. देवाच्या कृपाछत्राची ही शक्ती आता म्हापसावासीयांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर पोचली आहे.

बोडगेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारही बाजूने उघडे आहे. मंदिराच्या मध्यभागी बोडगेश्वराची हातात काठी, डोक्यावर फेटा असलेली आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.

Bodgeshwar Jatra 2024
Lok Sabha Election: नावेलीतून 10 हजार मते मिळवून देणार; महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आश्वासन

मंदिरात अनेक देवदेवतांच्या आकर्षक सुबक कोरीव मूर्ती ही या ठिकाणी आहेत. या मंदिराला पुरोहित नाहीत, सेवेकरीच या मंदिराची पूजा करतात. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे पौष महिन्यात या मंदिराची जत्रा येते. पौष चतुर्दशीला जत्रेची सुरुवात होते आणि पौष पौर्णिमेला ती संपते. तसे बघितले तर जत्रा ही दीड दिवसांची असते.

पण त्याला पाच दिवसांचे स्वरूप देण्यात आलेले आहे. पाच दिवसांच्या या जत्रेला गोव्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. बोडगेश्वर अंगवणीचा देव असेही मानले जाते. म्हणजेच नवसाला पावणारा देव बोडगेश्‍वराला नवस केले जातात आणि ते केळ्याचा अख्खा घड अर्पण करून फेडलेही जातात. म्हापशात अनेक देवस्थाने आहेत.

दर एका आठवड्यातील वाराप्रमाणे प्रत्येक देव-देवतेचा एकेक दिवसही ठरलेला आहे. म्हापसावासीयांची ग्रामदेवता श्री शांतादुर्गा हिचा सोमवार, खोर्लीतील सातेरीदेवीचा मंगळवार, अन्साभाट येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थानचा बुधवार, दत्तवाडी येथील दत्तात्रेय महाराजांचा गुरुवार, फेअर बायश येथील लक्ष्मीनारायण देवस्थानचा शुक्रवार आणि महारूद्र देवस्थानचा शनिवार आणि रविवार म्हापशाचा राखणदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोडगेश्वराचा दिवस ! लोकसंख्या वाढत गेली, तशी अजूनही छोट्या- मोठ्या देवस्थानांची भर पडत आहे.

म्हापशात एके काळी दत्तवाडी हा भागच उंचावरील समजला जायचा. पण आता त्याही पुढे जाऊन कॉलेजच्या पुढे विस्तीर्ण पठारावर वसलेल्या गणेशपुरीत प्रशस्त असे गणपतीचे देऊळ उभे राहिलेले आहे. ‘संग्राम गणेश’ असे नाव लाभलेल्या त्या देवस्थानाचा उगम संघर्षातून झाल्याने संग्राम गणेश. खोर्लीतही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन अजून एका गणपती देवस्थानाची भर पडलेली आहे.

अन्साभाट येथील उंचावरील भागात पुष्कळ पायऱ्या चढून जावे लागणाऱ्या भागात आणखी एका गणपती देवस्थानाची भर पडलेली आहे. न्यायालय इमारतीच्या परिसरात समता संवर्धनेच्छू समाजाचे विठ्ठल-रखुमाईचे छोटेखानी मंदिर आहे.

काणका येथे साईबाबांचे प्रशस्त देऊळ असून साईची मूर्ती तर शिर्डीतील मूर्तीसारखीच दिसते,त्यामुळे हे मंदिर प्रतिशर्डी गणले जाते. तिथेही गुरुवार साजरे केले जातात. टॅक्सी स्टँडवरही घुमटीवजा मंदिरात साईबाबा विराजमान आहेत. तिकडेही गुरुवारी नित्यनेमाने साईभक्त आरती करतात. शिरसाट बिल्डिंग परिसरात बाजाराच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे छोटेखानी देऊळ आहे.

बाजारपेठेच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मी पूजनोत्सव भक्तिभावाने साजरा होतो. वाड्यावाड्यांवर अर्थात सीम, अलंकार थिएटर परिसर, शेट्वाडा, फेअर बायश येथील लक्ष्मीनारायण देवळासमोर व तारीकडे येथे श्रीराष्ट्रोळी विराजमान आहे.

डांगी कॉलनीत गोधनेश्वराचे देऊळ वसलेले आहे. फक्त धुळेर भागात देवळांची वानवा भासते. त्यामुळेच कदाचित शेटवाडा भागातील राष्ट्रोळी देवस्थान बरेच नावारूपाला आले असावे. म्हापसा शहरात प्रवेश करताना तेथील शेतजमिनीवर असलेले देव बोडगेश्र्वर देवस्थान सर्वांच्या नजरेत भरते.

प्रत्येकजण देव बोडगेश्र्वराच्या चरणी वाहायला केळी घेऊन जात असतो. दर रविवारी बोडगेश्वराच्या परिसराला छोटेखानी जत्रेचे स्वरूप येते. सुंदर प्रकारे हे देऊळ विकसित केले गेल्याने दर्शनसुखाबरोबरच मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेण्यासाठी बोडगेश्वर मंदिर सर्वांचे क्षणभर विसाव्याचे ठिकाण बनले आहे.

मंदिराचा झालेला कायापालट वाखाणण्याजोगा आहे. झाडाखाली असलेली बोडगेश्र्वराची उभी भव्य मूर्ती आश्वासक वाटते. तिथे पंचकेळी भेट देऊन सांगणे करण्याची प्रथा आहे. रविवारी देवळाचा परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो. देवळाच्या समोर उभा दीपस्तंभ देवळाची शोभा वाढवतो.

डेरेदार वृक्ष व त्या सावलीत विराजमान मुंडासे बांधलेली आणि कांबळ व हातात काठी असलेली बोडगेश्वराची मूर्ती सजीव वाटते. त्यांच्या सान्निध्यात थोडा वेळ बसल्याने भाविकांना मनःशांती लाभते. नवस बोलणे, नवस फेडणे हा प्रकार अव्याहत सुरू असतो. हल्लीच निधन झालेले मुख्य पुजारी स्व. श्यामसुंदर गावकर यांची उणीव सर्वांना भासते. त्यांची गाऱ्हाणे घालण्याची पद्धत आणि बोलण्याची लकब वेगळीच असायची.

नियमितपणे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे नाव त्यांना तोंडपाठ असायचे. त्यांच्याकडून सांगणे घालून घेतल्याचे समाधान वेगळेच होते. त्यांच्या गाऱ्हाण्याची गोडी सर्वांना लागलेली होती. त्यांचे अकस्मात जाणे बोडगेश्वर भक्तांसाठी वेदनादायी आहे.

देव बोडगेश्र्वराचे असे वैशिष्ट्य सांगितले जाते की, तो संकटात सापडलेल्या आणि वाट चुकलेल्या भक्तांना माणसाच्या रूपात प्रकट होऊन सुखरूप घरी नेऊन पोहोचवतो. त्यांच्या कोल्हापुरी शैलीच्या पायताणांचा कर कर आवाज ऐकू येत असल्याच्या आख्यायिका आहेत. प्रत्येक म्हापसेकरांची अशी धारणा आहे की, आपल्याला त्यांचे सुरक्षा कवच आहे.

जीवनाच्या वाटचालीत येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देतेसमयी देव बोडगेश्र्वर आपली राखण करेल, ही भावना असते. उत्तरोत्तर बोडगेश्र्वर देवस्थान प्रगती करत बरेच नावारूपाला आलेले आहे. सध्याचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांच्या अध्यक्षतेखाली या मंदिरात अनेक कार्यक्रम कार्यकारिणी आयोजित करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com