Shiroda Daboli: सफर गोव्याची! पश्चिम घाटातून प्रवास करणाऱ्या हिंस्र जनावरांचा फोंड्यातील डोंगर भाग मुख्य रस्ता

Shiroda Daboli Stream: शिरोड्याच्या दाबोली परिसरात मोठ्या प्रमाणात मरड आणि सरद वायंगण शेती आहे. तिथला शेतकरी इंचभरही जागा पडीक ठेवत नव्हता.
Shiroda Daboli Stream
Shiroda Daboli Stream Canva
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

फोंडा: स्वामी विवेकानंद म्हणतात, तत्परता, तन्मयता आणि तेजस्विता या तीन शब्दांत ‘त’कारावस्थेतून शरीरात तारुण्य प्रवेश करीत असते. त्याच प्रकारे निसर्ग ओहोळातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला तारुण्याची ताकद देतो, हे आमच्या पूर्वजांना माहीत होते. म्हणून त्यांनी पाण्याला महत्त्व देऊन ओहोळांच्या काठावर सौंदर्यसंपन्न कुळागरे, बागायती, शेती निर्माण करण्यास आपल्या बौद्धिक शक्तीचा उपयोग केला.

निसर्ग देवाच्या भक्तीत रमत देवाचा आशीर्वाद मिळवून आमच्यासाठी वसुंधरेची फळे राखून ठेवण्यासाठी अविरत कष्ट घेतले. आपल्या गोमंत भूमीला देव मानून वर्षभर येणाऱ्या सहा ऋतूंच्या सहा सोहळ्यात कष्ट करीत अनोख्या सृष्टी सौंदर्याचा आविष्कार उभा करून दाखवला. अशा गोव्याचा संपूर्ण पश्चिम भागाला निळा सागर किनारा, पूर्वेला सकाळ होताच उगवणारा सूर्य आपला प्रकाश पश्चिम घाटाच्या हिरव्या उंच शिखरावर सोनेरी किरणे फैलाऊन राज मुकुट घातल्या प्रमाणे आपल्या कमलनयनांना त्याचा भास होतो.

उत्तर आणि दक्षिण बाजूने मैदाने, पठारे, कुळागरे, शेती, नद्या हे आपापले काम करतात. या चार सीमांच्या मध्यभागी सुवर्ण सुंदर गोमंतकातील मंदिरात सकाळ संध्याकाळ घंटानाद कानात घुमतो. मशीद, चर्चमध्ये त्या त्या धर्माचे लोक देवाची प्रार्थना करतात.

नद्या, खाडी, ओहळ, तलाव, झरी नित्य वाहत आपले काम करतात. त्याच पाण्याच्या आधारावर माणसाप्रमाणे कैक जातीचे पक्षी, पाळीव जनावरे गोड्या पाण्यातील मासळी, सरपटणारे प्राणी, हिंस्र जनावरे जगतात.

पन्नास-साठ वर्षांपूर्वी बिबटा, गवा, मेरू, माकड, हत्ती, भुजंग अशी हिंस्र जनावरे पूर्वजांच्या वस्तीत न येता वनातील तलाव, झरी, धबधबे, ओहळ, नद्यांच्या काठावर संध्याकाळच्या वेळी पाणी पिऊन जात होती. ईश्वराने मुक्या प्राण्यांना पाण्याची व्यवस्था प्रथम करून देऊन नंतर ते पाणी माणसासाठी खालच्या भागात पाठवले आहे, हे पाण्याचा अभ्यास करताना जाणवते.

सकाळ होताच आपण बाहेर पडत कुळागर, ओहोळाचा काठ, शेती, बागायतीत जाताना हिवाळ्याच्या दिवसात पडणाऱ्या शुभ्र धुक्याची मलमल चादर पाहतो. त्या चादरीतून पडणारे थेंब गवताला मिठी मारून बसतात. त्यावर आपली पावले पडल्यास त्या पावलाचे ठसे उमटलेले पाहावयास मिळतात.

त्यावर बसलेला सफेद दव गळून हिरव्या ऋणांची पावले पाहावयास मिळतात. शेतातील मऊ चिखल मातीवरून चालताना तिच्यावर पडलेली पावले दिसतात. त्यातून बाहेर पडणारा मातीचा ओला गंध चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो, हे निसर्गाचे खेळ पाहावयास मिळतात. गावातील जत्रेला रात्रीचे जाताना उजेडासाठी पेटवलेली माडाच्या झावळांची चूड घेऊन पायवाटेने चालताना, त्या प्रकाशाच्या रांगेत चालणारे पूर्वजांचे चित्र डोळ्यासमोर दिसते.

पंढरीच्या वारकऱ्यांची भक्ती आठवते. गावातील धालो, फुगडी, तालगडी, गोफ, शिगमा, वीरभद्र हे लोककलेचे खेळ, ते ढोल, तासा, ढोलकी, शहनाई, घुमट, समेळ, कासाळे, तोणयो, घुंगूर, टाळ, मृदंग या वाद्यांचा लय आणि स्वर त्यांच्या लोककलेला लाभला. ती सुंदर, महन्मधुर ठेव त्यांनी आपल्या नंतरच्या पिढीसाठी पवित्र ओहोळाच्या काठावर ठेवली.

गावातील मुलांच्या शाळा म्हणजे गोकूळच होते. दिवाळी आली म्हणजे कौलारू घराची सफाई, आकाशकंदील, पणत्यांची आरास, विविधरंगी रांगोळी, नवीन कपडे, अमावस्येच्या भयाण उत्तर रात्री वाईट विचारांचा नायनाट करण्यासाठी भाताच्या गवताची नरकासुराची प्रतिमा करून तिला पहाटे जाळून नव्या चांगल्या विचारांनी पुढची वाटचाल करीत ओहोळाच्या काठावर राहून त्या वाहणाऱ्या पाण्यात स्नान करून सोवळेपण राखले.

लोहचुंबकाप्रमाणे पाण्याची ओढ ठेवून नवनवीन संकल्पना साकारून पर्यावरणाचे तत्त्व पाळले. माणसाच्या जीवनाला अर्थ देण्याचे काम संतांनी प्रवचनाने केले. त्याच प्रकारे पूर्वजांनी पर्यावरणीय संकल्पना साकारून ओहोळाच्या पाण्यावर प्रेम करणारी पाऊलवाट आम्हांला तयार करून ठेवली होती.

या विचाराचे ओझे पाठीवर घेऊन प्रवास करीत मी शिरोड्याकडून दाबोली शिरोडा ठिकाणच्या ओहोळाच्या काठाकडे पोहोचलो. शिरोड्याच्या दाबोली परिसरात मोठ्या प्रमाणात मरड आणि सरद वायंगण शेती आहे. तिथला शेतकरी इंचभरही जागा पडीक ठेवत नव्हता. त्या परिसरातील बागायती आणि शेतीला पाणी पुरवणाऱ्या ओहोळाचा उगम रानखोल सर्पागाळ या डोंगराळ भागात उंचावर होतो आणि पश्चिम बाजूने खाली वाहण्यास तो सुरुवात करतो.

रानखोल सर्पागाळ परिसर फारच दुर्गम आहे. पश्चिम घाटातून प्रवास करणारी हिंस्र जनावरे पंचवाडी, शिरोडा, निरंकाल, कोनशे, कोडार, बेतोडा, बोरी या गावच्या डोंगर, माळरान, पठारी भागातून उत्तर दिशेकडील कुर्टी, खांडेपार, ढवळी, बांदोडा, प्रियोळ, केरी, सावईवेरे, बेतकी, कुकळ्ये, प्रियोळ, वेलींग, कुंडई, अडकोण, वरगावकडून खांडोळा गावच्या डोंगर भागात येतात.

फोंडा तालुक्यातील या गावांचे डोंगर भाग त्यांचा जाण्यायेण्याचा मुख्य रस्ता आहे. प्रत्येक गावाला निसर्गाने ओहळ आणि गवताळ माळराने दिल्याने त्यांच्या अन्नाची सोय होत होती. आज मानवाने त्यांच्या अन्न पाण्यावर ‘हावळ’ आणल्याने ते अन्नासाठी शेती, बागायतीत घुसून गरीब शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवतात. मग वाईट काय आणि चांगले काय याचा शोध घेत आपणासच हा धडा शिकावा लागेल.

रानखोल सर्पगाळ भागातून दाबोलीचा ओहळ खाली मरिओरव कुल्लेकोणकडून पाणी पुरवत गळेशेत गुळ्ळे भागाला पाणी देत गवळार भागाला पाणी पुरवतो. पुढच्या प्रवासात शेण्यार, देवळामरडकडून दाबोली भागाला गोड्या पाण्याने भिजवत भागमरड शेताला पाणी देतो.

पुढच्या प्रवासात भिकतर ठिकाणी आपला प्रवाह पोचवत तिथल्या मानशीतून आणि कातर मानशीतून जुवारीच्या पात्रात खार पाण्याशी मीलन घडवतो. फोंडा तालुक्यात शिरोडा गाव भात पिकात अग्रेसर होता, त्याचप्रमाणे त्याला कुळागर, बागायतीचे मोठे वरदान लाभले आहे.

Shiroda Daboli Stream
Kalem: सफर गोव्याची! विजेचा कडकडाट झाला, शिलाखंडाला भेग पडली आणि दूधसागरचे पाणी 'काले' येथे प्रकट झाले

त्या गावातील ओहोळाच्या पाण्यावर बरीच नररत्ने घडली आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुले विद्या, खेळ, शिक्षण, लोककला, संगीत शिकून मोठी झाली. डॉक्टरी पेशाने समाजसेवक झाले. शिक्षणाने गुरुवर्य बनले, अध्यात्माने लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. नाट्यकलेने रसिकांची मने जिंकली. त्यापुढे जाऊन आपल्या शेतात, भाटात कुदळीने खणून निसर्ग वाढवला.

कितीही शिक्षण घेतले, नाव कमावले असले तरीही शेतात जाऊन नांगर हातात घेताना त्यांनी कमीपणा मानला नाही. सकाळी भाजी, भाकरी खाऊन त्या ओहोळाचे पाणी प्याले. दुपारच्या जेवणात भाताबरोबर जुवारीच्या पाण्यातील गावठी मासळीचा आस्वाद घेतला. ओहोळाच्या पाण्यावर पोट आणि मन तृप्त झालेल्या त्या माणसांनी आकाशाला गवसणी घालून आपले पाणी दाखवले. तेच ओहळ बुजले, बुजवले तेव्हा या मातीतल्या माणसांत व त्यांच्या घरातील नळांत ते पाणी दिसत नाही.

Shiroda Daboli Stream
Shiroda: सफर गोव्याची! शिरोड्याचा ओहळ सिद्धनाथ पर्वतावरून वाहत कामाक्षीच्या चरणांवरून पुढे शिवाचे दर्शन घेतो

वरून खाली वाहणारा ओहळ मानशीतून पाणी नदीला देताना निसर्गाचा चमत्कार पाहावयास मिळतो. ज्यावेळी नदीला भरती येते त्यावेळी गोडे पाणी आपले वज्ररूप दाखवत नाही. पण नदीला सुकती आली म्हणजे मानशीतून बाहेर येणारे पाणी आपल्यात भरलेले वग्रांग दाखवते. नदीला तुडुंब भरती आली म्हणजे मानशीची दारे आपोआप बंद होऊन आतल्या खळीत मानशीच्या दाराच्या फटीतून पाण्याचे कारंजे आकाशाकडे झेप घेण्याचा प्रयत्न करते. त्या कारंजात खळीतील मासळी मानशीच्या दारात जमून सुंदर गोफ विणल्या प्रमाणे नाचतात. त्याला ‘उमाळा’ म्हणतात.

हे निसर्गचक्र मानशीच्या मुखाकडील पाण्यात चालूच असते. कवी कुलगुरू कालिदासाच्या चैतन्यमय अलौकिक मेघदूत खंडकाव्य आषाढात ऐकल्याने पुढच्या श्रावणाची ओढ लागते, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सुकलेला ओहळ पावसाळ्याची वाट पाहत प्रथम वर्षा अंगावर झेलल्याने त्यातील सजीव प्राणी आपल्या स्वरांनी तानसेनाचे राग आळवीत कालिदासाच्या मेघदूताला मंत्रमुग्ध करतात, असा मनाला भास होतो. जे निसर्गात होते तेच संस्कृत साहित्यात आले. फुटीरतेच्या द्राविडी प्राणायामामुळे संस्कृत भाषा गमावली आहे, आता ओहोळाच्या पाण्यावर पोसलेली संस्कृतीही गमावण्याच्या मार्गावर आहोत. आमच्या पूर्वजांनी कमवले ते आम्ही हरवत चालत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com