
संध्याकाळचे जवळपास ५ वाजले आहे आणि 73 वर्षांची महानंदा कारापूरकर मैदानावर सरावासाठी सज्ज आहे. गोव्यात पुढील काही दिवसात होणाऱ्या शिगमो परेडमध्ये तिने आपला सहभाग नोंदवला आहे; होय, तुम्ही बरोबर वाचले आहे ती 73 वर्षाची आहे आणि यंदाच्या शिमगो परेडमध्ये ती नाचणार आहे. अर्थात ती एकटी नाही. कमालीची उष्णता आणि थकवा आणणारे वातावरण असून देखील विविध वयोगटातील 147 महिला दोन तासांच्या कठोर सरावासाठी मालभाट, मडगाव येथील साई मंदिराजवळ नेहमी एकत्र येत आहेत.
यंदा 15 ते 29 मार्च या कालावधीत गोव्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये शिमगो परेडचे आयोजन होणार आहे. पुरुषप्रधान शिमगो परेडमध्ये महिलांचा एवढा मोठा गट सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सराव सुरू करण्यास उत्सुक असलेली महानंदा पुढे सरकते आणि कलाश्री महिला शिमगोत्सव मंडळांच्या सदस्यांमध्ये ती वयाने सर्वात ज्येष्ठ असल्याची पुष्टी करते.
आपली साडी अंगाभोवती आवळून घेत आणि स्पोर्ट शूज बांधत ती सांगते, 'मला नाचायला आवडते आणि या शिगमो परेडमध्ये मला मनसोक्त नाचायची संधी मिळणार आहे.' ती बोलत असताना तिच्या भोवती जमा झालेल्या तिच्या मैत्रिणी ओरडून सांगत असतात की महानंदा एक विलक्षण नृत्यांगना आहे आणि तिच्याकडे तासंतास नृत्य करण्याची क्षमता आहे.
शुभम नाईक हे या संघाच्या ढोल-ताशा प्रशिक्षक आहेत. संघामधील महिलांच्या आवडीनुसारच त्यांनी त्यांना वेगवेगळी कामे वाटून दिली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यांनी सर्व काही व्यवस्थित आखले आहे आणि त्यानुसार संघामधील महिलाही त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. सुमारे 20-22 दिवसांपूर्वी त्यांचे हे सराव सत्र सुरू झाले आहे.
शुभम नाईक सांगतात, 'सराव सुरू करण्यापूर्वी मी सहभागी झालेल्या महिलांना सांगितले होते की या कार्यक्रमासाठी समर्पण आणि समन्वय या दोन बाबी अत्यंत आवश्यक आहेत आणि त्यांना आपल्या कामात परिपूर्ण होण्यासाठी सुमारे एक महिना लागू शकेल.’
या संघातील महिला काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून त्यांच्या पती आणि मुलांनी देखील वेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या उपक्रमाला एक संयुक्त असे स्वरूप मिळाले आहे. या उपक्रमाची सुरुवात उषा कामत यांनी महिलांचा संघ तयार करून केली.
मंडळाच्या सर्व सदस्यांसाठी साड्या आणि एक प्रशिक्षक मिळवून देण्याची जबाबदारी तिने स्वतः उचलली आहे. या परेडमध्ये भाग घेताना नथ इत्यादी पारंपारिक दागिन्यांसह नऊवारी साडी परिधान करण्याची त्यांची योजना आहे. ज्या शैलीत त्यांना परेडमध्ये नाचायचे आहे ते साडी नेसून नाचणे सोपे जाईल असे त्यांना वाटते. मात्र ढोल-ताशा वाजवणाऱ्या मुली सलवार-कमीज नेसणार आहेत. त्या वेशात त्यांना आपल्या वाद्यांवर लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे जाईल हा त्यामागचा हेतू आहे. या संघात लुईसा मोरियास आणि शिरीन खान यांचाही समावेश आहे. लुईसा म्हणते, 'नृत्याला कसलीच सीमा नसते आणि त्यामुळेच आम्ही इथे आहोत.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.