
Shankar Polji statement on Kamat: सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी राज्यात २४ तासांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिल्याने एकीकडे दिलासा व्यक्त होत असताना, दुसरीकडे मात्र या आश्वासनांवरून राजकारण तापले. आके मडगाव येथील एका सत्कार समारंभात मंत्री कामत यांनी केलेल्या विधानांवरून सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी मंत्री कामात यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
मंत्री दिगंबर कामत यांच्या या आश्वासनावर सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी एक व्हिडिओ शेअर करत जोरदार टीका केली आहे. "येत्या २० दिवसांत रस्ता ठीक करतो असे आश्वासन देऊनही अजून काहीच कारवाई झालेली नाहीये," असे सांगत त्यांनी मंत्र्यांना "जमत असलेल्या गोष्टीच सांगा" असे आवाहन केले आहे. पोळजी यांनी केवळ कामत यांच्यावरच नाही, तर संपूर्ण सरकारवर निशाणा साधला आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री बांधकाम मंत्री असताना त्यांनी राज्यात एकही खड्डा दिसणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र आता पूर्ण गोवाच खड्डेमय झाला आहे, असे ते म्हणाले. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून, त्यात लोकांचे बळी जात आहेत. असे असतानाही मंत्री फक्त आश्वासने देत आहेत, कृती काहीच करत नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे.
रस्त्याचे डामरीकरण करू असे म्हटल्यामुळे इतर कामे देखील थांबली असून, रस्त्यावर किमान माती तरी घालता आली असती, पण ते देखील झाले नाही. पावसामुळे काम थांबत असेल तर ते अगोदरच लोकांना सांगायला पाहिजे होते, खोटी आश्वासने देणे योग्य नाही, असेही पोळजी यांनी म्हटले आहे. विमानतळाकडे जाणारा हा रस्ता धोक्याची घंटा बनलाय, अनेकवेळा पर्यटक देखील या रत्स्यावरून ये-जा करतात, त्यांना आपण असे रस्ते देणार आहोत का? असा सवाल त्याने उपथित केला.
मडगावमधील एका सत्कार समारंभात बोलताना मंत्री दिगंबर कामत यांनी जनतेला २४ तासांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. कोणतीही व्यक्ती तक्रार करेल किंवा वृत्तपत्रात खड्ड्यांचे फोटो प्रसिद्ध झाल्यास, आपल्या आदेशाची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करावी, असे स्पष्ट आदेश आपण दिल्याचे त्यांनी सांगितले. "सुलभता हे माझे वैशिष्ट्य आहे, म्हणूनच तर मी इतकी वर्षे राजकारणात पाय घट्ट रोवून उभा आहे," असे सांगत त्यांनी आपल्या स्वभावाचे महत्त्व अधोरेखित केले.
मागील ३० वर्षे मडगावचे आमदार म्हणून सेवा करत असून, काँग्रेसमध्ये असो वा भाजपमध्ये, आपल्या याच वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतात, असा दावा त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री असताना देशात लोकांसाठी सहज सुलभ असलेला मुख्यमंत्री कोण याचे सर्वेक्षण झाले होते, त्यात आपल्याला पहिला क्रमांक देण्यात आला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. त्यांचे दरवाजे नेहमीच मडगावकरांसाठी उघडे असतात, आणि भविष्यातही राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.