Bicholim : सेवेत रुजू करून घेण्यासाठी सेझा (वेदान्ता) कंपनीने लादलेल्या अटींमुळे डिचोलीतील कामगारांमध्ये खळबळ माजली आहे. भविष्यात या अटी मारक ठरू शकतात, अशी भीती कंपनीच्या या कामगारांमध्ये पसरली आहे. त्यांनी आज सोमवारी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली व पूर्वीच्याच अटी, नियम कायम ठेवावेत अशी मागणी केली.
वेदान्ता कंपनीने पूर्वीच्या ‘सेझा’ कामगारांना सेवेत रुजू करून घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र त्यासाठी कामगारांना कंपनीच्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत. दहा अटींपैकी बदलीचे धोरण, कामगार संघटनेस हरकत आणि आऊटसोर्सिंग या अटी कामगारांना मान्य नाहीत. त्या अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘सेझा’च्या कामगारांनी आज मये येथे जाऊन आमदार प्रेमेंद्र शेट यांची भेट घेतली. यावेळी किशोर लोकरे, दीपक पोपकर यांचीही उपस्थिती होती. राज्याबाहेर बदली, कामगार संघटनेस हरकत या अटी आम्हाला मान्य नसल्याचे कामगारांनी आमदारांना सांगितले. एक तर या अटी मागे घ्याव्यात किंवा उर्वरित सेवाकाळ गृहीत धरून कामगारांचे सेटलमेंट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सकारात्मक तोडग्याचे आश्वासन
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी कामगारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांना दिले. याप्रश्नी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आमदार शेट यांनी कामगारांना सांगितले.
‘सेझा’च्या 313 कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेदान्ता कंपनीला सहकार्य करण्यास कामगार तयार आहेत. मात्र तीन अटींचा फेरविचार व्हावा. धेंपोकडून खाण घेताना सेझा कंपनीने पूर्वीच्याच अटी आणि नियमांचा अवलंब केला होता. आता त्याच अटींची कार्यवाही व्हायला हवी.
- किशोर लोकरे, सरचिटणीस, कामगार संघटना
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.