Goa News: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील दूषित पाणी साळ नदीत जाऊन नदी प्रदूषित होण्यासाठी प्रकल्पाची देखभाल करणारा कंत्राटदार आणि अभियंता जबाबदार असून पाणी बाहेर सोडण्यासाठी जे इमर्जन्सी व्हॉल्व असते ते खुले केल्यामुळेच हे दूषित पाणी नदीत गेले, असा खुलासा सांडपाणी व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष व पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी केला.
या प्रकल्पातील प्रक्रिया न केलेले दूषित पाणी नदीत जाऊन प्रदूषण झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर आज काब्राल यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस उपस्थित होते.
यावेळी काब्राल म्हणाले, गरज नसताना इमर्जन्सी व्हॉल्व खुले केल्याने ही गोष्ट घडली आहे. ही चूक कुणाकडून झाली त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. जो भाग नादुरुस्त झालेला आहे त्याची दोन दिवसांत दुरुस्ती केली जाईल. भविष्यात हे इमर्जन्सी व्हॉल्व वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊनच खोलले जाईल.
पंचायतींनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एमआरएफ प्रकल्प उभारले नाहीत म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचायतींना 10 हजार दंड ठोठावला. त्याच न्यायाने साळ नदीचे प्रदूषण केल्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन महामंडळाला दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.