नवी दिल्ली: ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ने आज जाहीर केलेल्या २०२४ सालच्या मानांकनाच्या नवव्या आवृत्तीत ‘आयआयटी मद्रास’ने देशातील सर्वोत्तम उच्चशिक्षण संस्थेचा मान पटकावला आहे; तर गोवा विद्यापीठ सलग तीसऱ्या वर्षी देशातील सर्वोत्तम १०० विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवू शकलेले नाही.
गोवा विद्यापीठाची २०२१मध्ये टॉप १०० वरून घसरण झाली. २०२२ व २०२३ मध्ये विद्यापीठ १०१ ते १५० ‘बँड’वर घसरले होते. त्याचीच पुनरावृत्ती २०२४ मध्येही झाली. देशातील अव्वल विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि फार्मसी क्षेत्रातील उच्चशिक्षण संस्थांचे मानांकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०१५ पासून नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क पद्धत स्वीकारली.
देशातील ५८ हजार उच्च शैक्षणिक संस्थांपैकी यंदा ६,५१७ शैक्षणिक संस्थांनी मानांकन स्पर्धेत भाग घेतला. विविध श्रेण्यांसाठी १०,८४५ अर्ज करण्यात आले होते. आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत उच्चशिक्षण संस्थांचे मानांकन जाहीर करण्यात आले. ‘एनआयआरएफ’च्या नवव्या आवृत्तीत राज्य विद्यापीठ, खुले विद्यापीठ, कौशल्य विद्यापीठ अशा तीन नव्या श्रेण्यांची भर घालण्यात आली.
सर्वोत्तम १०० व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये ‘गोवा इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, साखळी (जीआयएम) ३७व्या स्थानी घसरले आहे. संस्थेने गतवर्षी प्रगती करत ३६वरून ३३व्या स्थानी झेप घेतली होती.
देशातील अव्वल १०० फार्मसी महाविद्यालयांमध्ये ‘गोवा कॉलेज ऑफ फार्मसी’ला ९३वे स्थान प्राप्त झाले आहे. ही संस्था गेल्या वर्षी ६६व्या स्थानी होती.
१. धेंपे कॉलेज, मिरामार, पीईएस कॉलेज फर्मागुडी : १५१ ते २०० बँड
२. सरकारी कॉलेज, साखळी, चौगुले कॉलेज, मडगाव, सेंट झेविअर कॉलेज, म्हापसा, विद्या प्रबोधिनी कॉलेज, पर्वरी : २०१ ते ३०० बँड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.