

वास्को: सांकवाळ-कुठ्ठाळी येथील ब्ल्यूबेरी हॉलपासून काही अंतरावर असलेल्या एका केटरिंग आस्थापनाच्या सेप्टीक टाकीतील सांडपाणी पंपाद्वारे मोकळ्या जागेत सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी उघडकीस आणला.
या आस्थापनाकडे केटरिंग करण्यासंबंधी आवश्यक असलेल्या परवानग्या नसतानाही आस्थापन तेथे काम करीत आहे, असा दावाही त्यांनी केला. याप्रकरणी ते आस्थापन वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ज्या कंपन्यांना जेवण पुरविते, त्या कंपन्यांनी त्यांचे करार रद्द करावेत, अशी विनंती वाझ यांनी केली आहे.
आस्थापन आपले सांडपाणी मोकळ्या जागेत सोडून नजीकच्या गावातील पर्यावरण बिघडवत असल्याचा आरोप करीत या आस्थापनावर कारवाई करण्याची मागणी वाझ यांनी केली. या केटरिंग आस्थापनापासून काही अंतरावर एक सेप्टीक टँकर सांडपाणी ओतण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी आला असताना स्थानिकांनी तो पकडला होता.
याप्रकरणी आमदार वाझ यांना माहिती देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी आले होते. तत्पूर्वी, तेथील कच्च्या रस्त्याने जाताना वाझ यांनी तेथे एका ठिकाणी सेप्टीक टाकीतील सांडपाणी पंपाद्वारे खेचून मोकळ्या जागेत सोडण्यात येत असल्याचे पाहिले होते. त्यानंतर ते पुन्हा त्या रस्त्याने परतत असताना त्यांना तो पंप दिसला नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता, तेथे पंपच नव्हता, असे सांगण्यात आले.
सांडपाणी सोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद
कुठ्ठाळी येथील ब्ल्यू बेरी हिलसमोरच्या निर्जनस्थळी उघड्यावर सेप्टिक टँकरातील सांडपाणी सोडत असताना काल स्थानिकांनी पकडलेल्या मोहरदेश शेख याच्याविरोधात वेर्णा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मोहरदेश शेख हा झरीत- झुआरीनगरचा रहिवाशी असून तो मूळचा पश्र्चिम बंगालचा आहे. शुक्रवारी तो ब्ल्यू बेरी हिलसमोरच्या निर्जनस्थळी सेप्टीक टँकरमधील सांडपाणी सोडत असताना त्याच्या मागावर असलेल्या स्थानिकांनी त्याला पकडले होते. या प्रकरणी साहाय्यक उपनिरीक्षक परेश फळदेसाई पुढील तपास करीत आहेत.
कारवाईसाठी संबंधित विभागाला सूचना
या आस्थापनाला फक्त अन्नपदार्थांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. तथापि, ते आस्थापन तेथे अन्नपदार्थ तयार करून वेर्णा औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वितरित करीत असल्याची माहिती मिळाली.
कोणतीही परवानगी नसताना अन्नपदार्थ तयार करणाऱ्या त्या आस्थापनाविरोधात कारवाई करण्यासंबंधी संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे.
जोपर्यंत सदर आस्थापन पर्यावरणीय व स्वच्छता नियमांची अंमलबजावणी करीत नाही, तोपर्यंत औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी करार रद्द करावेत, असे वाझ म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.