Goa Excise Scam: अखेर निरीक्षकांसह तिघे निलंबित

27.78 लाख रुपये वसूल; मद्यसाठ्याचीही होणार चौकशी
Excise scam
Excise scamDainik Gomantak

Goa Excise Scam अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयातील आर्थिक घोटाळा व मद्य परवानाधारकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची चौकशी करून खात्याने मुख्य सूत्रधार वरिष्ठ कारकून हरीश नाईक याच्यासह अबकारी निरीक्षक दुर्गेश नाईक व विभूती शेट्ये या तिघांना आज निलंबित केले.

या घोटाळ्यातील एकूण 27 लाख 78 हजार रक्कम व्याजासह वसूल करण्यात आली. पेडणे कार्यालयातील जप्त केलेल्या मद्यसाठ्याची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी दिली.

पेडणे तालुक्यातील मद्यालयांकडून मद्य परवान्याचे नूतनीकरण न केल्याप्रकरणी अबकारी खात्याने त्यांना नोटिसा बजावल्या होत्या.

या नोटिसा मिळताच 76मद्य परवानाधारकांनी पेडणे येथील अबकारी कार्यालय गाठून त्यांनी नूतनीकरणाचे शुल्क भरल्याच्या पावत्या सादर केल्यावर या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता व खात्याने त्याची चौकशी सुरू केली होती.

या चौकशीवेळी वरिष्ठ कारकून हरीश नाईक याने आर्थिक गैरव्यवहार केल्याची कबुली दिली. त्याने डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०२२ या पाच वर्षांत केलेल्या गैरव्यवहाराची मूळ रक्कम १६ लाख ८१ हजार रुपये होती. ती रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात आली.

आत्तापर्यंत फसवणूक झालेल्या ७६ मद्य परवानाधारकांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हरीश नाईक याच्याकडे नूतनीकरण शुल्क जमा केल्याचे सांगितले आहे. त्याने स्वतःकडे ठेवून घेतलेली रक्कमही जमा केल्याने तो दोषी ठरत आहे.

त्यांच्याविरुद्ध आरोप ठेवून खात्यांतर्गत चौकशी सुरू केली जाईल. या घोटाळ्याची माहिती उघड झाल्यापासून अबकारी खात्याने अंतर्गत चौकशी सुरू ठेवली होती.

झालेल्या घोटाळ्यातील रक्कम वसूल करणे हा मुख्य हेतू होता. त्यामुळे प्रथमदर्शनी वरिष्ठ कारकून हरीश नाईक याला निलंबित करण्यात आले नाही.

पावत्यांवर बनावट स्टॅम्प!

ज्या काळात पेडणे अबकारी कार्यालयात हा घोटाळा झाला, तेव्हा तेथे तिसवाडीचे अबकारी निरीक्षक दुर्गेश नाईक व निरीक्षक विभूती शेट्ये होते. हरीश नाईक याने मद्य परवाने नूतनीकरण शुल्क जमा करून घेतल्यावर दिलेल्या पावत्या या निरीक्षकांच्या नावाने आहेत.

या पावत्यांवर बनावट स्टॅम्पही आहे. त्यामुळे या घोटाळ्यामध्ये या निरीक्षकांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखीही काहीजण गुंतल्याचा संशय

ज्या मद्य परवानाधारकांना पेडणे अबकारी कार्यालयातून शुल्क जमा केल्याप्रकरणी पावत्या देण्यात आल्या आहेत, त्या त्यांच्याकडून ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली आहे. त्यावर असलेले स्टॅम्प कार्यालयातील आहेत की ते बनावट आहेत याचाही शोध घेण्यात येत आहे.

वरिष्ठ कारकुनाने दिलेल्या जबानीनुसार या घोटाळ्यामध्ये पेडणे कार्यालयातील आणखी काहीजण तरी गुंतलेले आहेत असा संशय आहे. हा घोटाळा पाच वर्षांचा असूनही खात्याच्या अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता नसणे असे होऊच शकत नाही. या प्रकरणानंतर अबकारी खात्याने इतर कार्यालयातील आर्थिक व्यवहाराची माहिती मागविली आहे.

Excise scam
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात इंधनाचे दर स्थिर, दोन्ही जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या

माझा संबंध नाही

अबकारी खात्यातील घोटाळा हा जानेवारी २०२२ पूर्वीचा आहे. या खात्याच्या आयुक्तपदी माझी जानेवारी २०२२ मध्ये नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या घोटाळ्याशी माझा काहीच संबंध नाही. या घोटाळ्यात माझ्या नावाचा उगाचच उल्लेख काही राजकारणी करत आहेत.

हा घोटाळा कधी घडला याचा अभ्यास करावा. खात्याचा ताबा घेतल्यानंतर मद्य परवाने नूतनीकरण न केलेल्या मद्यालयांना नोटिसा बजावण्याचे निर्देश मी दिल्यानंतरच हा पर्दाफाश झाला आहे. - नारायण गाड, अबकारी आयुक्त

Excise scam
Mapusa: शेट्येवाडा म्हापसा येथे विहिरीची भिंत कोसळली ; दुचाकी बुडाली, घर धोक्यात

व्याजाचे १० लाख घेतले

या पाच वर्षाच्या काळात या एकूण रक्कमेवरील व्याज म्हणून १० लाख ९२ हजार रुपये मिळून एकूण २७ लाख ७८ हजार रुपयांची वसुली करण्यात आल्याचे गाड यांनी सांगितले. या प्रकरणी पेडणे कार्यालयात त्या काळात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्याही जबान्या नोंदवण्यात येत आहेत.

...म्हणून करण्यात आली होती बदली

चौकशीत बाधा येऊ नये व दस्तावेज गायब होऊ नये म्हणून हरीश नाईक याची पेडणे कार्यालयातून वाळपई येथे बदली करण्यात आली होती.

मूळ रक्कम व त्यावरील व्याज वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता व तसे त्याला सांगण्यात आले होते. त्याने खात्याची रक्कम कोठे गुंतविली होती का याचीही चौकशी करण्यात येत आहे, असे सूत्राने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com