म्हापसा: कोलवाळ कारागृहातील महिला साहाय्यक तुरुंगाधिकारी जयश्री वेंगुर्लेकर (53, चिखली-कोलवाळ) यांच्यावर तिघा महिला नायजेरियन कैद्यांनी हल्ला केल्याने त्यांना उपचारासाठी म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. उपचारानंतर सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
(Second attack on Jailor Vengurlekar in colvale Jail)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी 10.45 च्या सुमारास महिला कैदी सेलबाहेर घडली. या कैद्यांना रोज सकाळी 8 ते 10 च्यादरम्यान मोकळ्या हवेत सोडले जाते. मात्र, या तीन महिला कैदी आपल्या सेलमध्ये माघारी जात नव्हत्या आणि गोंधळ घालू लागल्या. त्यामुळे वेंगुर्लेकर यांनी तिघींना आतमध्ये जाण्याची सूचना केली. परंतु, त्यांनी वेंगुर्लेकर यांच्याशी वाद घातला. यातील एका महिलेने त्यांच्या पोटावर जोरदार ठोसा मारला, दुसऱ्या महिलेने काठीने ढकलत त्यांना जमिनीवर पाडले.
यावेळी वेंगुर्लेकर बेशुद्ध झाल्या. कोलवाळ कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा इस्पितळात दाखल केले. वेंगुर्लेकर यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वेंगुर्लेकरांवर दुसरा हल्ला
तीन वर्षांपूर्वी वेंगुर्लेकर यांना मेट्रन साहाय्यक जेलरपदी बढती मिळाली. चार वर्षांपूर्वी वॉर्डन असताना अशाचप्रकारे वेंगुर्लेकर यांच्यावर कारागृहात हल्ला झाला होता. मात्र, तेव्हा काहीच कारवाई झाली नव्हती. वेंगुर्लेकर यांना स्पॉन्डिलायसिसचा त्रास असून, या झटापटीत जमिनीवर पडल्याने त्यांचा हा आजार बळावला. त्यामुळे त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या.
दोन महिलांवर गुन्हा दाखल
फिर्यादी जयश्री वेंगुर्लेकर यांच्या तक्रारीनुसार, मध्यवर्ती कारागृहातील दोन विदेशी महिला कैद्यांवर कोलवाळ पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी जेनेट (नायजेरियन) व प्रिशला (घाना) या महिलांविरुद्ध भादंसंच्या कलम 353, 323, 34 नुसार गुन्हा नोंदवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.