पणजी: कोरोनामुळे दीर्घकाळ बंद असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था अर्थात शाळा आणि महाविद्यालये आज सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहेत. नव्याने शाळा सुरू होणे हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी भावनिक विषय होता. कोविड नियमांचे पालन करून वर्ग भरवण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे दीप ओवाळून पेढे भरवत स्वागत झाले.
शाळा सुरू करण्याबाबतचा अध्यादेश शिक्षण खाते आणि विद्यापीठाने मागील आठवड्यातच जारी केला होता. तेव्हापासूनच विद्यार्थी, पालक व शाळा प्रशासनामध्ये शाळा सुरू करण्याबाबतची लगबग सुरू होती. सोमवारी प्रत्यक्ष तो दिवस उजाडला. आज केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मंगळवारी बाकी ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आजही अनेक विद्यार्थी प्रथमच शाळा-महाविद्यालयांमध्ये येत आहेत. एसओपीनूसार शाळेच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, थर्मल गनचा वापर होत आहे. गणवेशाची सक्ती नसल्याने बहुतांश विद्यार्थी आपल्या आवडीच्या ड्रेसमध्ये शाळेला आले. विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
दिव्यांग, विशेष मुलांचे ‘संजय स्कूल’ सुरू
राज्यातील नियमित शाळांबरोबर पर्वरी येथील दिव्यांग आणि विशेष मुलांचे संजय स्कूलही सुरू झाले. चेअरमन गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, 'स्पेशल चाईल्ड' शाळेत जवळपास ५०० विद्यार्थी आहेत. संपूर्ण गोव्यामध्ये इतर शाखांमध्ये मिळून एक हजारच्या आसपास विद्यार्थी शिकत आहेत. ऑनलाईन शिक्षणातून या विद्यार्थ्यांकडे म्हणावे इतके लक्ष देता येणे कठीण होते. पालकांचीही तारेवरची कसरत होत होती. आता शाळा सुरू झाल्यामुळे आम्ही या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ देऊ शकू. त्यांना लागणारे शिक्षण आणि सहाय्यता देण्यास आता आम्ही सक्षम आहोत.
शाळा सुरू करण्याबाबत शाळा प्रशासनाची तयारी होती. त्यामुळे आजचा दिवस नेहमीसारखा गेला. सध्या वर्ग ५० टक्के आसन क्षमतेने सुरू आहेत आणि नव्या सूचना येईपर्यंत त्याप्रमाणे सुरू राहतील. आमच्या विद्यालयात कोरोनाच्या संदर्भातली सर्व कार्यप्रणालीचे पालन केले जात आहे.
- अपर्णा च्यारी, मुख्याध्यापक, मुष्टिफंड हायस्कूल
विद्यार्थी रंगीबिरंगी वेशात : चालू सत्रातील शाळा केवळ एक महिनाच भरणार आहे. यामुळे शिक्षण खात्याने गणवेशाची सक्ती मागे घेतली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये रंगीबेरंगी वेशात विद्यार्थी दिसत होते. तर काही ठिकाणच्या शाळांनी जुना गणवेश कायम ठेवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.