

केपे: मीराबाग, सावर्डे येथे जुवारी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थिती हा बंधारा होऊ देणार नसल्याचा निर्धार रविवारी मीराबाग येथे झालेल्या सभेत करण्यात आला.
या सभेला चिंबल येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिरोडकर, पर्यावरणप्रेमी अभिजित प्रभुदेसाई, नीलेश गावडे आदी उपस्थिती होते.
मीराबाग येथील लोक मिळून मिसळून शांततेने राहत होते, परंतु बांधाऱ्यावरून गावात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे उपेंद्र नाईक यांनी सांगितले. सरकारने या बंधाऱ्याविषयी लोकांना विश्वासात घेणे गरजेचे होते.
तसेच याबाबत जनसुनावणी घ्यायला हवी होती, मात्र ती घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या गावावर संकट ओढवले आहे. त्यामुळे लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत, पण आमच्या आमदाराला काहीच पडून गेलेले नाही, असे नाईक यांनी सांगितले.
सरकारला जर पाणी न्यायचेच असेल तर ते पंपिंग करून न्यावे, त्यासाठी बांधाऱ्याची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा प्रकल्प लोक हिताचा असेल तर सरकारने लोकांना विश्वासात घेऊन हे काम करायला पाहिजे होते, असे नाईक यांनी सांगितले.
जुवारी नदीवर बांधण्यात येणारा बंधारा कुणासाठी व का पाहिजे हे सरकारने सांगितले पाहिजे. तसेच या प्रकल्पाच्या कामाचा अहवाल लोकांसमोर सादर केला पाहिजे होता, असे नीलेश गावडे यांनी सांगितले.
संकेत भंडारी तसेच इतर ग्रामस्थांनी आपले विचार व्यक्त केले. याठिकाणी बांधाऱ्याचे काम होऊ देणार नसल्याची शपथ यावेळी लोकांनी घेतली.
लोकशाहीत लोकांचे राज्य असायला हवे पण सरकारची काम करण्याची पद्धत पाहता सरकार हुकूमशाही चालवत असल्याचे सिद्ध होत आहे. राज्य सरकारने लोकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे पण तसे होत नाही सरकार प्रत्येक ठिकाणी लपवाछपवी करून काम करीत आहे. लोकांच्या जिवाशी खेळ करून आम्हाला विकास कामे व प्रकल्प नकोत. सरकार विचारशक्तीहीन बनले असून हे सरकार बहुजन समाजाला मुद्दामहून लक्ष्य करीत आहे, असा आरोप गोविंद शिरोडकर यांनी यावेळी केला.
पंचवाडी व शिरोडा येथील लोकांना पाणी पुरवण्यासाठी या बांधाऱ्याचे काम सरकार करीत आहे असे सांगितले जात असले तरी हे पाणी शिरोडा येथील एका फॅक्टरीसाठी नेले जात आहे, असे अभिजित प्रभुदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.