

वाळपई: सत्तरी तालुक्यातील विविध नद्यांवर उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला असून, तो अद्याप उपसला नसल्याने यंदाही अनेक गावांना पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने गाळ काढण्याची मागणी होत असतानाही जलसिंचन खात्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केला आहे.
सध्या पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंधाऱ्यांवरील प्लेट्स काढण्यात आल्या असून पाण्याचा निचरा सुरू करण्यात आला आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात वाहून आलेला गाळ, कचरा तसेच मोठमोठी झाडे अजूनही अनेक बंधाऱ्यांवर अडकून पडली आहेत. पावसाळ्यापूर्वी हे अडथळे दूर न केल्यास पाण्याचा प्रवाह रोखला जाऊन पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेषतः वेळूस नदी परिसरात दरवर्षी पुराचा धोका निर्माण होतो. म्हादई नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठी झाडे अडकून पडल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला आहे. मासोर्डे बांध परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता वाढली आहे. यंदा संरक्षक भिंत उभारण्यात आली असली तरी साचलेल्या गाळामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांपासून नदीकाठच्या गावांमध्ये आणि शेती-बागायतींमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान होत आहे. नदीपात्र गाळाने भरल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग बदलून तो थेट घरांमध्ये आणि शेतांमध्ये शिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे खडकी-सत्तरी येथील हरिजनवाड्यातील नऊ घरे कोसळली होती, तर शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. हवामान खात्याने यंदा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ‘पूर आल्यास जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक आमदार डॉ. दिव्या राणे यांनी या प्रश्नावर विधानसभेत वारंवार आवाज उठवला असल्याचे नागरिक सांगतात. मात्र, जलसिंचन खात्याने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने सर्व बंधाऱ्यांची पाहणी करून गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्र स्वच्छ करून अडकलेली झाडे, कचरा आणि गाळ हटवण्यात आला नाही, तर सत्तरी तालुक्यातील अनेक गावांना पुन्हा पुराचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी, बागायतदार आणि नदीकाठच्या रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.