Sattari
Sattari Dainik Gomantak

Sattari News : सत्तरीत हुर्राक, फेणीसाठी बोंडूच मिळेना; राज्यातील बागायतदारांना फटका

Sattari News : त्यामुळे योग्य प्रमाणात फुलधारणा झाली नाही. काही ठिकाणी झाडांवरील मोहोर जळालेला दिसून आला. परिणामी काजू बोंडू उत्पादन घटले. सत्तरी तालुक्यात काजू बोंडू फळापासून हुर्राक फेणी केली जाते.

Sattari News :

वाळपई ,सत्तरी तालुक्यात यंदा काजू पीक कमालीचे घटले आहे. त्यामुळे यावर्षी बागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. यंदा सुरुवातीपासूनच काजू झाडांना मोहोर कमी दिसून आला होता.

त्यामुळे योग्य प्रमाणात फुलधारणा झाली नाही. काही ठिकाणी झाडांवरील मोहोर जळालेला दिसून आला. परिणामी काजू बोंडू उत्पादन घटले. सत्तरी तालुक्यात काजू बोंडू फळापासून हुर्राक फेणी केली जाते. यावर्षी उत्पन्नच कमी असल्याने रस गाळप व्यावसायिकांना कर्नाटकातून बोंडू आणण्याची पाळी आली आहे.

एक टेम्पोमागे आठ ते नऊ हजार रुपये देऊन बोंडू विकत घ्यावी लागत आहेत. गोव्याच्या सीमाभागातील कर्नाटकात कणकुंबी, जांबोटी आदी ठिकाणाहून बोंडू मागविली जात आहेत.

गावो गावात लोकांनी परवाने काढून बोंडू रसाची फेणी, हुर्राक गाळप (स्थानिक भाषेत फेणी आवार) भट्टी पारंपरिक पध्दतीने काजू हंगामापुरती केली आहे. त्यासाठी दररोज हुर्राक करण्यासाठी बोंडू रस आवश्यक असतो. यंदा उत्पन्न घटल्याने व्यावसायिकांना बोंडू बाहेरून घ्यावी लागत आहेत.

सध्या १११ प्रती कि. दर आहे. एकूणच या वर्षी सुमारे ४५ ते ५० टक्के उत्पन्न मिळेल. बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून काजू पीकही घटले आहे.

सत्तरी तालुक्यात अन्य काही फेणी व्यावसायिक बाहेरून काजू बोंडू आयात करीत आहेत. या वरूनच या वर्षीची एकंदरीत परिस्थिती लक्षात येते.

पावसाचे सावट आता चिंतेचे बनले आहे. कारण मोठ्या पावसामुळे बोंडूही खराब होतात. बोंडूमध्ये पाणी जाऊन हानी होत असते,असे वाळपईचे माजी आमदार तथा फेणी व्यावसायिक नरहरी हळदणकर यांनी सांगितले.

आमचा अनेक वर्षांपासून फेणी, हुर्राक व्यवसाय आहे. नगरगाव, ब्रम्हाकरमळी भागातील आमची फेणीची पावणी आहे. दरवर्षी दररोज काजू बागायतदार सुमारे पंधरा लीटरचे दीडशे डबे बोंडू रस देत होते.

पण यावर्षी उत्पन्न घटल्याने चाळीस ते पन्नास डबे रस मिळतो आहे. हवामान, वातावरणाचा परिणाम म्हणून उत्पन्न कमी झाले आहे. त्यातच आता पावसाचे सावट असल्याने पाऊस पडल्यास काजू बियांचा किलोमागील दरही उतरण्याची शक्यता आहे.

-नरहरी हळदणकर,माजी उपसभापती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com