Goa Congress : सासष्टी परत काँग्रेसच्या बाजूने; समीकरणांत बदल

Goa Congress : दिगंबर कामत, उल्हास तुयेकर, आलेक्स सिक्वेरा डेंजर झोनमध्ये?
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress :

फोंडा, या लोकसभा निवडणुकीत सासष्टीने काँग्रेसला ऊर्जा देण्याबरोबरच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना चपराक देण्याचे कामही इमानेइतबारे केल्याचे दिसत आहे. यावेळी काँग्रेसला सासष्टीत ६१ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाल्यामुळे इथे काँग्रेस परत एकदा कात टाकू शकते, असे संकेत मिळायला लागले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जाणाऱ्या सासष्टीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. त्यावेळी ‘आप’ने काँग्रेससमोर जबरदस्त आव्हान उभे केले होते. सासष्टीतील आठ मतदारसंघांपैकी फक्त मडगाव, कुंकळ्ळी व नुवे या तीनच मतदारसंघांत काँग्रेसला यश प्राप्त झाले होते.

तर वेळ्ळीत काँग्रेसचा विजय फक्त १७० मतांनी हुकला होता. त्यानंतर झालेल्या घडामोडीत मडगावचे दिगंबर कामत व नुवेचे आलेक्स सिक्वेरा हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसजवळ सासष्टीतला फक्त कुंकळ्ळी हा एकच मतदारसंघ राहिला होता. त्यामुळे सासष्टीत काँग्रेस कमजोर झाल्यासारखी वाटत होती. पण या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने चांगले यश मिळविले. अर्थात या यशात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई तसेच ‘आप’चा वाटा असला तरी वारे काँग्रेसच्या बाजूने वाहत असल्याचे संकेत मिळायला लागले आहेत. यात सर्वात जास्त परिणाम मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर होऊ शकतो असे बोलले जात आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कामत यांना १३,६७४ मते प्राप्त झाली होती. या मतांवर काँग्रेसपेक्षा कामतांचा जास्त अधिकार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेल्या कामतांनी भाजपच्या पल्लवी धेंपेंना लोकसभा निवडणुकीत मडगावातून कमीत कमी दहा हजार मतांची आघाडी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता; पण प्रत्यक्षात भाजपला मडगावातून फक्त १,३२३ मतांची आघाडी मिळू शकली.

हा दिगंबरांना मोठा ‘धक्का’ असल्याचे बोलले जात आहे. गेल्या विधानसभेत त्यांना प्राप्त झालेली ८,००० मतांची आघाडी आता १,३०० पर्यंत घटल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रभावी उमेदवार दिल्यास दिगंबर ‘डेंजर झोन’मध्ये जाऊ शकतात, असा होरा राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

तीच गोष्ट आलेक्स सिक्वेरांची. ते मंत्री होऊन ही नुवे मतदारसंघातून काँग्रेसला मिळणारी पारंपरिक आघाडी कमी करू शकले नाहीत. या लोकसभा निवडणुकीत भाजपला नुवे मतदारसंघातून फक्त २,६७७ मते प्राप्त झाल्यामुळे काँग्रेसला जवळजवळ १४,००० मतांची आघाडी प्राप्त होऊ शकली. यातून आलेक्स ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे स्पष्टपणे प्रतीत होत आहे. नावेलीमध्ये तशीच परिस्थिती दिसत आहे.

Goa Congress
Mumbai Goa Highway: शनिवारी बंद झालेला मार्ग रविवारी सुरु झाला, मुंबई - गोवा महामार्गावर भूस्खलन

‘ना घर का, ना घाट का’

भाजपचे आमदार उल्हास तुयेकर यांची स्थिती सध्या ‘ना घर का ना घाट का’ अशी झाल्यासारखी वाटते आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत तुयेकर हे फक्त चारशे मतांनी निवडून आले होते. पण या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपवर या मतदारसंघातून तब्बल पावणेसहा हजार मतांची आघाडी घेतल्यामुळे गेल्यावेळी घेतलेली चारशे मतांची आघाडी फसवी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावेळी आप, काँग्रेस, तृणमूल हे स्वतंत्रपणे लढल्यामुळे भाजपला निसटता विजय मिळाला होता, हे सत्य आता परत अधोरेखित व्हायला लागले आहे.

एकसंध राहिल्यास विजय शक्य

कुडतरी मतदारसंघात कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे भाजप सरकारात घटक असूनही या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपवर तब्बल १०,००० हजारांची आघाडी घेतली. हे पाहता ‘इंडिया आघाडी’ एकसंध राहिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत या आघाडीला सासष्टीतल्या आठ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांत विजय मिळवणे कठीण नाही, असा होरा राजकीय तज्ज्ञ मांडत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com