केपे: टोनीनगर-सावर्डे येथील स्थानिकांनी आज पाण्याची वाढीव बिले आल्याने बाणसाय येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला. भरमसाठ बिले आल्याने गोंधळ उडाला असून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तीन महिन्यांची वाढीव बिले एकत्रित आल्याने ती कशी भरावी, असा संतप्त सवाल स्थानिक उपस्थित करू लागले आहेत.
यासंदर्भात 25 रोजी पाणी खात्याच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल करून त्यावर तोडगा काढावा, असे म्हटले होते. मात्र संबंधित खात्याकडून कोणताच प्रतिसाद नसल्याने अखेर आज मोर्चा आणावा लागला, असे सर्वेश सावंत यांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांची वाढीव बिले एकत्रित आल्याने लोकांनी ती कशी भरावी, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तीन महिन्यांचे पाणी बिल एकदम आल्याने सावर्डेवासीयांनी नाराजी व्यक्त केली.
लोकांना भरमसाठ पाण्याची बिले आल्याने लोक गोंधळले आहेत. पूर्वी ज्या लोकांना महिन्याला पाचशे ते हजार रुपये बिल येत होते त्यांना चार ते पाच हजार बिल आल्याने लोक अचंबित झाल्याचे सावंत यांनी सांगितले.
राज्य सरकारने 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र एवढे पाणी झाल्यानंतर युनिटचे दर परवडणारे नसल्याने, हे दर रद्द करावेत, अशी मागणी लक्ष्मण नाईक यांनी केली. अचानकपणे आलेली ही बिले आम्ही गरीबांनी कशी भरणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे
पाणी खात्याचे जे कर्मचारी बिल देण्यासाठी येतात त्यांच्याच चुकीमुळे ही भरमसाठ बिले आली आहेत. पूर्वी कमी बिल येत होते; पण आता अचानक हा आकडा कसा वाढला, याचे उत्तर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी द्यावे, असा आग्रह स्थानिक सुनीता नाईक यांनी धरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.