Sanquelim News: कुडणेतील श्री देव कुडणेश्वर हा हरवळेतील श्री देव रुद्रेश्वरचा मोठा भाऊ असल्याने महाशिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे हरवळेतील श्री रुद्रेश्वर देवाचे पहिले दिवज पेटविण्याचा व नंतर रथावर श्रीफळ वाढविण्याचा मान हा कुडणेतील गावकर महाजनांचा आहे. तो मान कुणी हिरावून घेऊ नये, असे महाजनांतर्फे सांगण्यात आले.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कुडणेश्वर देवस्थानातील महाजन बळजबरीने श्री रुद्रेश्वर मंदिरात त्यांना नसलेला मान व हक्क मागण्याच्या उद्देशाने येतील आणि गोंधळ घालतील.
त्यामुळे मोठ्या संख्येने भंडारी समाजातील बांधवांनी हरवळेत जमा व्हावे, असा एक संदेश श्री रुद्रेश्वर देवस्थानच्या अध्यक्षांकडून पसरविण्यात आला होता.
त्यावर खुलासा म्हणून कुडणे येथील श्री कुडणेश्वर देवस्थान समिती व महाजनांतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष उदय मळीक, सचिव अर्जुन मळीक, खजिनदार कृष्णा मळीक, उपाध्यक्ष गोकुळदास मळीक, उपखजिनदार महादेव मळीक व इतर महाजन उपस्थित होते. या देवस्थानचे ज्येष्ठ महाजन सदानंद मळीक यांनी संपूर्ण माहिती दिली.
महाजनांचा पूर्वापार चालत आलेला मान चुकवण्याचा प्रकार दुर्दैवी
1. दरवर्षी कुडणेतील जत्रोत्सवात हरवळेतील श्री रुद्रेश्वराकडून श्री कुडणेश्वराला फुले येतात. शिमगोत्सवातही हरवळेतील गावकऱ्यांकडून होळी कुडणेत आणली जाते.
ती कुडणेत आणण्यापूर्वी श्री रुद्रेश्वराकडे नेऊन सांगणे केले जाते व नंतर ती कुडणेत आणून ठरलेल्या जागेत रोवली जाते.
2. त्या रात्री हरवळेतील गावकर गडे उत्सवाचा आनंद घेतात आणि दुसऱ्या दिवशी चोरोत्सव झाल्यानंतर आपल्या गावी परततात.
पंरतु, गेल्यावर्षी व यावर्षी कुडणेतील गावकर महाजनांना महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार असलेल्या दिवजोत्सव व रथोत्सवात प्रथम श्रीफळ वाढविण्याच्या मानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडला. हा प्रकार दुर्दैवी आहे, असे सदानंद मळीक यांनी यावेळी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.