

साखळी: राजधानी पणजी शहराच्या धर्तीवर साखळी शहराचा जो सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात आला होता, त्याची ८० टक्के अंमलबजावणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या आराखड्यामुळे साखळी शहराचे रूप पालटत असून, लवकरच उर्वरित कामेही पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. साखळी येथील वाळवंटी नदीच्या 'रिव्हर फ्रंट' विकास प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
साखळीच्या विकासासाठी सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. केवळ इमारती किंवा प्रकल्प नव्हे, तर दळणवळण सुलभ करण्यावरही सरकारचा भर आहे. याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहराच्या अंतर्गत रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण करण्यात येणार असून, टिकाऊपणासाठी त्यांचे काँक्रीटीकरण केले जाईल. यामुळे साखळीतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही शहराचे महत्त्व वाढेल.
शहराचे सौंदर्य राखणे ही केवळ सरकारचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. साखळी शहर जेवढे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहील, तेवढेच येथील फ्लॅट्स आणि भूखंडांच्या किमतीत वाढ होईल.
आर्थिक फायद्यासाठी आणि आरोग्यासाठी कचरा उघड्यावर टाकू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. "हरित हरवळे, विकसित विर्डी आणि सुंदर साखळी" हा २०१२ साली दिलेला आपला संकल्प आता प्रत्यक्षात उतरताना पाहून समाधान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी यावेळी साखळीच्या विकासात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. नगरपालिकेला विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण स्वायत्तता आणि आर्थिक पाठबळ दिले असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. जोगड्याची हाळी साखळी बाजार येथे उभारलेल्या नवीन मंडपाच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक आनंद काणेकर यांनीही आपले विचार मांडले.
शहराच्या प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांनी कोणताही अडथळा न आणता सहकार्य करावे, जेणेकरून साखळी एक 'मॉडेल सिटी' म्हणून ओळखली जाईल, असे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाळवंटी नदीचा रिव्हर फ्रंट प्रकल्प हा साखळीच्या सौंदर्यात भर घालणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.