
Sand Mining Extraction Permission From Zuari Mandovi River
पणजी: राज्यातील मांडवी आणि झुआरी या नद्यांमधून रेती काढण्यास परवाने देण्याचे काम येत्या गुरुवारपासून (ता.५) सुरू होणार आहे. पर्यावरण दाखल्यांअभावी हे परवाने देण्याचे काम रखडले आहे. मांडवी नदीच्या तुलनेत झुआरी नदीतून रेती काढण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या परवान्यांसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपली आहे.
खाण संचालक नारायण गाड यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, मांडवी नदीत सात विभागांमध्ये रेती काढण्यासाठी ४७ परवाने देण्यात येतील. झुआरी नदीतील पाच विभागांत ६० परवाने देण्याची तरतूद आहे. मांडवीतील रेती काढण्यासाठी १३५ जणांनी, तर झुआरी नदीतील रेती काढण्यासाठी केवळ १५ जणांनी अर्ज केले आहेत. काही अर्ज कागदपत्रे जोडल्याशिवाय सादर झाले आहेत. त्यांना कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. त्यामुळे अर्जांची संख्या वाढू शकते.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून दोन्ही नद्यांमधील रेती साठ्याविषयी अभ्यास करवून घेतला होता. त्याआधारे पारंपरिक पद्धतीने रेती काढण्यासाठी किती परवाने देता येतील आणि किती रेती काढता येईल, याची निश्चिती केली आहे. त्याआधारे पर्यावरण दाखल्यांसाठी अर्ज केले आहेत. पर्यावरण दाखले मिळाले की परवाने देणे सुरू केले जाईल.
खाण संचालक गाड यांनी सांगितले की, जिल्हा सर्वेक्षण अहवालातील चुकीमुळे राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीच्या मागील बैठकीत पर्यावरण दाखले देण्याचा निर्णय होऊ शकला नव्हता. आमोणे भागात रेती काढण्यासाठी परवानेच मागितले नव्हते. ते मांडवी नदीतील तिन्ही भाग दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हा सर्वेक्षण अहवालात समाविष्ट केले होते. ती तांत्रिक चूक होती. मुळात त्या भागात रेती काढण्यासाठी परवानगीच मागितली नसल्याने तो मुद्दा गैरलागू होता; पण चूक ती चूक. आता नव्याने जिल्हा सर्वेक्षण अहवाल सादर केले आहेत.
पर्यावरण संचालक जॉन्सन फर्नांडिस यांनी सांगितले की, राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीची बैठक बुधवारी (ता. ४) रोजी घेण्यात येणार आहे. रेती काढण्यासाठी पर्यावरण दाखले मागण्यासाठी अर्ज आल्यास समिती त्यावर विचार करेल. मागच्या वेळी तांत्रिक चुकीमुळे समितीने त्यावर निर्णय घेतला नव्हता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.