पणजी: राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर (Goa Beach) तेलगोळे (Oil spheres) येऊन किनारे काळवंडत असले तरी तेलगोळे तयार होण्यासाठी कोणत्या जहाजातून वंगण किंवा इंधन खोल समुद्रात सोडले गेले हे सिद्ध करणे सोपी गोष्ट नसते. तेलगोळे ते जहाजातून सांडल्या गेलेल्या तेलामुळेच तयार झाले आहेत की काय हे दोनापावलच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (NIO) प्रयोगशाळेत समजू शकते. आताही त्यासाठी तेलगोळ्यांचे नमुने गोळा केल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष गणेश शेटगावकर यांनी सांगितले.
तेलगोळ्यांप्रकरणी मंडळाने कोणावर कारवाई केली आहे का, हे जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता शेटगावकर म्हणाले की, तेलगोळ्यांची उत्पत्ती कोणत्या जहाजामुळे झाली हे आधी निश्चित केले पाहिजे. तेलगोळे सापडल्यानंतर त्यासाठी आपण तटरक्षक दलाशी संपर्क साधून खोल समुद्रात कोणते इंधनवाहू जहाज उभे करून टाकी साफ करत आहे का हे पाहावे यासाठी संपर्क साधला होता. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उडू शकले नाही आणि ते तपासता आले नाही.
भारतीय उपखंडाच्या बाजूने आंतरराष्ट्रीय जलमार्ग जातो. त्या मार्गावरून इंधनाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते. इंधनवाहू जहाजे रिकामे परत जाताना खोल समुद्रात टाक्या धुतात. काही जहाजे देखभालीच्या कामानंतर वंगण, इंजीन ऑईल समुद्रात सोडतात. ते वंगण व इंधन समुद्राच्या पाण्यात मिसळत नाही मात्र ते घुसळले जाते. वाऱ्याच्या वेगामुळे ते पसरतही जाते. त्यातून एक प्रकारचा तवंग समुद्राच्या पृष्ठभागावर दिसतो. त्याचे रुपांतर किनाऱ्याकडे तवंग सरकत असताना तेलगोळ्यांत होते. त्यावर बाह्य हवेतील घटकांचाही परिणाम होतो, असे शेटगावकर म्हणाले.
दरवर्षी येतात तेलगोळे
आंतरराष्ट्रीय मार्गावर कोणते जहाज असे कृत्य करते यावर उपग्रह छायाचित्र सेवेच्या माध्यमातून लक्ष ठेवणे शक्य आहे याचा विचार सरकारी पातळीवर केला गेला पाहिजे, असे शेटगावकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. तेलगोळे यंदाच किनाऱ्यावर आले असे नव्हे तर ते दरवर्षी येतात. त्यांचे प्रमाण कमी जास्त असते. यंदा समुद्र जरा जास्त खवळलेला असल्याने तेलगोळ्यांचे प्रमाण जास्त होते. ते गोळा करून हटवले तर त्यांचा कोणताच धोका राहत नाही, असेही त्यांनी सांगितले.
तेलगोळ्यांतील विविध 23 घटकांचे परीक्षण केले जाते व त्याद्वारे ते जहाजातून सोडलेल्या तेलामुळे तयार झाले हे सिद्ध करता येते. मात्र नेमक्या कोणत्या जहाजातून तसे करण्यात आले हे सिद्ध करता येत नाही. जहाजांनी महिनाभर आधी सोडलेल्या इंधनामुळे गोळे किनाऱ्याला लागतात. त्यामुळे आताच जहाजाने तेल समुद्रात सोडले आणि गोळे किनाऱ्यावर लागणे सुरु झाले असे म्हणता येणार नाही.
- गणेश शेटगावकर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.