Premier League Cricket: साळगावकर क्रिकेट क्लबने सर्वाधिक 25 गुणांची कमाई करत गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यांच्याविरुद्ध जीनो क्लबला दुसऱ्या डावात 214 धावांचे आव्हान पेलवले नाही, परिणामी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. साळगावकर क्लब व जीनो क्लब यांच्यातील महत्त्वपूर्ण अखेरचा साखळी सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. अनिर्णित लढतीत साळगावकर क्लबला तीन गुण मिळाल्याने त्यांचे अग्रस्थान अबाधित राहिले, तर एक गुण मिळालेला जीनो क्लब 22 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला.
दरम्यान, सामन्याच्या शेवटच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी साळगावकर क्लबने पहिल्या डावात 129 धावांची आघाडी घेतली. साळगावकरच्या 382 धावांच्या उत्तरादाखल जीनो क्लबचा पहिला डाव 253 धावांत संपुष्टात आला. नंतर साळगावकर क्लबचा दुसरा डाव 111 धावांत संपुष्टात आला. जीनो क्लबच्या मोहित रेडकरने 37 धावांत 7, तर दर्शन मिसाळने 50 धावांत 3 गडी बाद केले. मोहितने सामन्यात 157 धावांत 13 गडी बाद केले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना साळगावकरच्या सागर उदेशी (2-40) व लखमेश पावणे (3-42) यांनी जीनो क्लबची 19 षटकांत 6 बाद 92 अशी बिकट स्थिती केली. चहापानाला दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या संमतीने सामना अनिर्णित जाहीर करण्यात आला.
कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर धेंपो क्रिकेट क्लबने स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना पणजी जिमखान्याला 125 धावांनी हरविले. धेंपो क्लबच्या पहिल्या डावातील 265 धावांना उत्तर देताना पणजी जिमखान्याचा डाव 166 धावांत संपुष्टात आला होता. नंतर धेंपो क्लबने दुसरा डाव 9 बाद 233 धावांवर घोषित करून पणजी जिमखान्यासमोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले. जीवन चित्तेम याच्या 75 धावांनंतरही पणजी जिमखानाचा डाव 207 धावांत संपुष्टात आला. धेंपो क्लबचे अर्पित सिंग (5-61) व विकास सिंग (4-59) यशस्वी गोलंदाज ठरले. विकासने सामन्यात 89 धावांत 11 गडी बाद केले.
सांगे येथील जीसीए मैदानावरील अनिर्णित लढतीत मडगाव क्रिकेट क्लबला आघाडीचे तीन गुण मिळाले. त्यांच्या पहिल्या डावातील 448 धावांना उत्तर देताना चौगुले क्लबचा पहिला डाव 319 धावांत संपला. शंतनू नेवगी याने 69, तुनीष सावकारने 88, तर सनिकेत पालकरने 35 धावा केल्या. मडगाव क्रिकेट क्लबच्या वाय. वासू याने 89 धावांत 6 गडी बाद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.