Lok Sabha Assembly Elections 2024: भाजपाशिवाय पर्याय नसल्याने तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपा जिंकणार यासंबंधी तिळमात्र शंका नसल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केले.
रविवारी फोंडा येथे होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला मुरगाव तालुक्यातील अधिकाअधिक कार्यकर्ते व हितचिंतकही उपस्थित राहणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अमित शहा यांच्या सभेसंबंधी नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांची खास बैठक येथील रेल्वे हॉलमध्ये घेण्यात आली. याप्रसंगी सदानंद तानावडे यांच्यासह वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज, भाजपा मुरगाव मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर, वास्को मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, दाबोळी मंडळ अध्यक्ष संदीप सुद, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, संतोष केरकर. जयंत जाधव उपस्थित होते.
या बैठकीचे औचित्य साधून मांगोरहिल येथील संदीप नार्वेकर यांनी भाजपामध्ये आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. नार्वेकर हे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपापासून दूर गेले होते. त्यांची घर वापसी झाल्याने वास्को मतदारसंघाला लाभ होणार असल्याचे तानावडे यांनी सांगितले.
अमित शहा यांच्या जाहीर सभेसंबंधी आम्ही तयारीचा आढावा घेऊन काही नियोजन केले असल्याचे आमदार आमोणकर यांनी सांगितले. सदर सभा एक इतिहास घडविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुरगाव मतदार संघातून 80 टक्के मते भाजपाच्या लोकसभा उमेदवाराला मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार साळकर यांनी नार्वेकर यांच्या घरवापसीमुळे संघटना मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. येणाऱ्या दिवसांमध्ये भाजपामध्ये आणखी काहीजणांची घरवापसी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गत लोकसभा निवडणुकीत भाजपाला येथे जी मते मिळाली होती.त्यापेक्षा ४० टक्के अधिक मते मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संदीप नार्वेकर यांनी घरवापसीसंबंधी आपले विचार व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.