पणजी: पर्यटन हा राज्याचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. उत्तम पर्यटनस्थळ म्हणून गोव्याची जगभर ख्याती आहे. राज्यातील समुद्र किनारे, वारसास्थळे, खाद्यसंस्कृती, चर्च, मंदिरे आदी बाबी जगभर प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षांत गोव्याला बदनाम करणारे उद्योग-व्यवसाय चोरी-छुपे सुरू आहेत.
(Rohan Khaunte will not allow illegal activities in tourism)
मसाज पार्लर, डिस्को, डान्सबार, क्लबच्या नावाखाली बेकायदा उद्योग सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कडक भूमिका घेतली असून राज्यातील पर्यटनस्थळी बेकायदा आणि अवैध धंदे चालू देणार नाही, असे वक्तव्य पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.
येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. पर्यटकांची गैरसोय होऊ नये याची खात्याच्यावतीने काळजी घेतली जात आहे. केवळ समुद्र किनारेच नव्हे, तर राज्यातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळी विविध साधन-सुविधा उभारण्याची सरकारची योजना आहे. आगामी पर्यटन हंगामापूर्वी पर्यटनस्थळांवर आमुलाग्र बदल दिसून येईल, असे मंत्री खवंटे म्हणाले. संबंधित खात्यांचे आवश्यक ते परवाने घेऊन चालणाऱ्या उद्योग व्यवसायाविषयी कोणाची हरकत नाही. मात्र, अवैध आणि बेकायदेशीर उद्योगांना राज्यात थारा देणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गोवा सीमेजवळच्या महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात चालेल्या गैरव्यवहारावर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. चंदगडमधील तरुणांना जेवणासाठी चांगले हॉटेल दाखवतो म्हणून एका मसाज पार्लरमध्ये नेऊन त्यांना विवस्त्र करून मारहाण झाली होती. तसेच त्यांच्याकडील पैसे काढून घेऊन आणखी पैशांची मागणी केली होती. अशा घटना राज्याच्या पर्यटन व्यवसायाला धोकादायक असल्याने अशा प्रकारांविरुद्ध कडक कारवाईचे धोरण सरकारने अवलंबले आहे.
‘पावसाळी पर्यटनावर भर’
गेल्या काही वर्षांपासून राज्यात वर्षभर पर्यटक येत आहेत. लग्नसोहळे, कॉर्पोरेट बैठका, कार्यशाळा, संमेलन अशा अनेक गोष्टींसाठी गोव्याची निवड केली जात आहे. यामुळे देशी पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एरवी राज्यातील पर्यटन हंगाम आठ महिन्यांचा असायचा, हल्ली बाराही महिने पर्यटक येत असल्याने सरकार पावसाळी पर्यटनावर भर देत असल्याचे मंत्री रोहन खवंटे यांनी यावेळी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.