Goa News: रस्त्यावर घर, हे कुणीही समजू शकतो; पण चक्क घरावरून रस्ता, याची कुणी कल्पना तरी करू शकतो का? पण मडगाव येथील ‘एसजीपीडीए’च्या नियोजकांनी ही कमाल करून दाखवली आहे. हे आम्ही नव्हे, तर खुद्द त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष दाजी साळकर हेच सांगतात.
काल प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. जुन्या मंडळाने तयार केलेल्या आराखड्यात जिथे घरे अस्तित्वात आहेत, तिथे रस्ते दाखविण्याची कमाल तर केली आहेच, शिवाय एकाच भागातील काही घरे कमर्शियल दाखविली आहेत, तर काही रेसिडेंशियल. असा जंतर-मंतर आराखडा ‘एसजीपीडीए’च करू जाणे.
कशी जिंकणार लोकांची मने?
गत विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसवाले अक्षरश: हवेत विहरत होते. सरकार आपलेच येणार, अशी स्वप्ने पाहात होते. एवढेच नव्हे, तर अनेकांनी आधीच अप्रत्यक्षरित्या मंत्रिपदेही वाटून घेतली होती. पण प्रत्यक्ष निकालाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
त्यांचे प्रभारी असलेले दिनेश राव गेले व त्या जागी टागोर आले. पण गेल्या दहा-अकरा महिन्यांत या संघटनेने पक्ष बळकट करण्यासाठी काय केले, याचे उत्तर कोणाकडेच नाहीत.
गोव्याबाबत कसलीच माहिती नसलेले टागोर येऊन गोमंतकीयांची हृदये जिंकून सत्तेवर येण्याच्या वल्गना करत आहेत; पण केवळ घोषणा वा वल्गना करून लोकांजी मने जिंकता येत नाहीत, हे त्यांना सांगावे लागेल, असे आम्ही नव्हे, काँग्रेसवालेच म्हणत आहेत.
बँक लॉकरचे न सुटणारे कोडे
दिवाळखोरीत निघालेल्या मडगाव अर्बन बँकेचे असंख्य सेफ लॉकर बँकेने अनेकदा आवाहने करूनही ग्राहकच दावा करण्यासाठी पुढे न आल्यामुळे पडून आहेत. प्रश्न तेवढ्यावरच संपत नाही, तर सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गोवा अर्बन बँकेसमोरही लॉकरबाबत अशीच समस्या उभी ठाकली आहे.
या बँकेने लॉकरच्या भाडेपट्टी करारात सुधारणा करून नव्याने या करारपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी ग्राहकांना पाचारण केले असता तब्बल 119 ग्राहक प्रतिसाद देत नाहीत की, त्यांच्या पत्त्यावर सापडत नाहीत. त्यामुळे हे काय प्रकरण असावे, असे कोडे बँक प्रशासनाला पडले आहे. अन्य बँकांनीही त्यातून लॉकरबाबत अधिक सावधगिरीची पावले उचलली आहेत.
विजयचे आव्हान दामू स्वीकारणार?
सध्या फातोर्डा येथील बंद पडलेले ट्रॅफिक सिग्नल हा चर्चेचा विषय बनला आहे. या सिग्नल्सची देखभाल करण्यासाठी मडगाव पालिकेने पुढे येण्याची गरज होती.
पण हे सिग्नल्स विजय सरदेसाई यांनी उभारले असल्याने असेल कदाचित; पण या सिग्नल्सचा ताबा अजून पालिकेला दिला नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असा खुलासा हल्लीच मडगावचे नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी केला होता. यावर आता विजय सरदेसाई यांनी पालिकेकडे देखभाल करण्यासाठीही पैसे नसतील तर त्यांनी तसे घोषित करावे.
मी माझ्या स्वतःच्या पैशांनी देखभाल करण्यासाठी तयार आहे, असे म्हटले आहे. यासाठी विजयने दामू यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. विजयचे हे आव्हान दामू स्वीकारणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
कार्निव्हल कसला करता?
मांद्रे मतदारसंघातील जनता पाणी टंचाईला पुरती कंटाळली आहे. येथील संतप्त जनतेचा रोष मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना सहन करावा लागत आहे. मतदारसंघात पाण्याची टंचाई भेडसावत असताना कार्निव्हल कसले साजरे करता? असा प्रश्नही हे लोक करताना दिसत आहेत. काही लोकांनी ते स्वाभिमान बाजूला ठेवून भाजपच्या वळचणीला गेल्याचाही बेछूट आरोप केला आहे.
येथील रस्ते खोदकामामुळे सर्व रस्ते धुळीने माखले आहेत. या धुळीचा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. याची जराही फिकीर या नव्या आमदार महोदयांना नसल्याची टीका त्यांच्या मतदारसंघातील लोकांनी केली आहे.
आता तर उन्हाळा सुरू होणार आहे. सध्या फेब्रुवारी महिन्यातच लोकांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. पुढे एप्रिल, मे महिन्यात कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागणार, कोणालाच माहीत नाही. उत्सव बाजूला ठेवून पाणी द्या, असे जनताच लोकप्रतिनिधींना सांगत आहे. कालाय तस्मै नम:
स्मृतीताईंचा मानभावीपणा
गेली दहा वर्षे म्हणजे 2012 पासून स्मृतीताई म्हणजेच स्मृती इराणी गोव्याला चांगल्याच परिचित आहेत. छोट्या पडद्यावरील त्यांच्या अभिनयाचा भाजपने चांगलाच उपयोग करून घेतला. पण मुद्दा तो नाही.
केंद्रात मंत्री असलेल्या इराणी यांचे उत्तर गोव्यातील सिली सोल्स हे रेस्टॉरंट तेथील बेकायदा प्रकारांमुळे चांगलेच गाजले. त्यामुळे सध्या ते बंदच आहे. त्याचे सगळे श्रेय आरटीआय कार्यकर्ते आयरिशबाबांना जाते. या स्मृतीताईंच्या मुलीचा- झुबीनचा विवाह सोहळा राजस्थानात होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याचे खास निमंत्रण त्यांनी आयरिशबाबांनाही पाठवले आहे.
त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी तेही महावस्ताद निघाले. त्यांनी या आमंत्रणाला प्रत्युत्तर देताना नवदाम्पत्याला शुभेच्छा तर दिल्याच; पण सिली सोल्स प्रकरण मुख्य सचिवांकडे सुनावणीस असून आपण त्यात पक्षकार असल्याने आपणाला या सोहळ्यात सहभागी होता येत नसल्याचे कळविले. म्हणजे एकप्रकारे निमंत्रणाला साभार पोच दिल्यासारखे झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.