

Fire in Scrapyard of Goa: गोव्यात जंगलात आग लागण्याच्या घटना सुरू असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. फोंडा ढवळी येथील आरके स्क्रॅपयार्डला आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की परिसरात आगीचे काळे ढग पसरले आहेत.
फोंडा, मडगाव तसेच सावर्डे आदी भागातून अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. (RK Scrapyard in Dhavalim Ponda caught major fire )
आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक जमले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काहींचे असे मत आहे की, कडक उन्हामुळे स्क्रॅपयार्डमधील एखाद्या गोष्टीने पेट घेऊन ही आग लागली असावी.
मात्र याचे खरे कारण कळू शकलेले नाही. आग झपाट्याने वाढत असून काळ्या धूरांचे लोट सर्वदूर पसरत असल्याचे दिसत आहे.
या आगीमुळे जवळच असलेले एक वाहन जळून खाक
माहितीनुसार, तिथे असलेले स्क्रॅपयार्ड हे अवैध असल्याचे मत घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका नागरिकाने व्यक्त केले. स्क्रॅपयार्डच्या बाजूला वस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तसेच हे स्क्रॅपयार्ड इथून हलवून दुसरीकडे नेण्याची मागणीही याआधीच नागरिकांनी पंचायतीला केली होती. मात्र त्यावर काहीच हालचाल झाली नाही.
त्यामुळे संतप्त नागरिकांनी, बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच या गोष्टींना उशीर होत असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील कुमार मोरजकर म्हणाले की, आगीचे कारण अद्याप कळले नसून, आग संपूर्णपणे विझल्यानंतरच याबाबत अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. मात्र स्क्रॅपयार्डमध्ये असलेल्या अनेक गोष्टींमुळे ही आग लागली असू शकते, जसे की प्लॅस्टिक.
स्क्रॅपयार्डच्या बाजूला पेट्रोलपंप आणि रहिवाश्यांची घरे आहेत, त्यामुळे आग पसरू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही; मात्र बाजूलाच असलेल्या एका वाहनाने पेट घेतला. काही जवान ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पूर्ण राज्यातील अग्निशमन केंद्रांवरून गाड्या बोलवल्या असल्याचे मोरजकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, चापोली धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर 30 एप्रिलला आग लागली होती.
आग लागल्यानंतर रहिवाशांनी सावधानतेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशामक दलाचे जवान आग लागलेल्या ठिकाणापर्यंत जाण्यास असमर्थ ठरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.