मडगाव : गोव्याचे अश्मयुगाशी असलेले आपले नाते सांगणारी आणि युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट होण्याच्या वाटेवर असलेले रिवण येथील उसगाळीमळ येथील प्रस्तरशिल्पे सध्या धोक्यात आली असून या वारसा स्थळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर एका खासगी मालकीच्या जमिनीत असलेली बंद चिरेखाण पुन्हा सुरू करण्यात आली आहे. (Rivan stone carvings related to the Stone Age are in danger )
मानवाच्या अगदी उत्क्रांतीच्या सुरवातीच्या काळाशी नाते असलेली ही शिल्पे दगडावर कोरलेली असून हल्लीच या शिल्पांची दखल युनेस्कोने घेत आपल्या वारसा यादीत त्यांना प्राथमिक स्वरूपात सामावून घेतले होते. पुरातत्व खात्याने ही जागा यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
या जागेपासून अवघ्या 100 मीटरवर आता चिरेखाण सुरू केली असून या खाणीवर जाण्यासाठी वाट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापण्यात काही ठिकाणी डोंगर कापून जागा सपाट केली आहे. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याच मतदारसंघात हा बेकायदेशीर प्रकार चालला असून पोलीस व खाण खात्यानेही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. गोव्यात बेकायदेशीर चिरे काढण्यास बंदी आहे.
मात्र या प्रकारावर वारसा प्रेमी आणि इतिहास अभ्यासकानी तीव्र नाराजी व्यक्त करताना हा प्रकार त्वरित थांबवा अशी मागणी केली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी या जागेत अशीच चिऱ्यांची बेकायदेशीर खाण चालू होती. त्यावेळी वारसाप्रेमींनी आवाज उठविल्यावर हा प्रकार बंद करण्यात आला होता. आता बऱ्याच वर्षांनी हा प्रकार पुन्हा चालू झाला असून ही खाण बंद झाली नाही तर आदिम काळाशी नाळ जोडून असलेली ही शिल्पे कायमची नष्ट होतील अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.