धोका वाढला; ५०६ रुग्‍ण सापडले

vishwajeet
vishwajeet

तेजश्री कुंभार

पणजी :

राज्यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची संख्‍या काही दिवसांपासून शंभरच्‍या पटीने वाढत आहे. मागील चोवीस तासांत आतापर्यंत सर्वाधिक ५०६ पॉझिटिव्ह रुग्‍ण सापडले. मडगाव येथील कोविड इस्पितळ अपुरे पडत आहे. त्‍यामुळे या इस्‍पितळावरील ताण कमी करण्‍यासाठी फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ दुसरे कोविड इस्पितळ म्हणून वापरण्‍यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्‍यान, रविवारी दिवसभरात आणखी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने संख्‍या पाऊणशेपर्यंत पोहोचली आहे. त्‍यामुळे लोकांत घबराट पसरली आहे.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी कोविडमुक्त झालेल्या लोकांना पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्‍याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत ३९जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. ज्या दहा रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केले, त्यातील सातजणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री राणे यांनी दिली. राज्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्‍यासंदर्भात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत आणि इतर डॉक्टरांसोबत तीन बैठका झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

इस्‍पितळात येणाऱ्यांसाठी अँटीजेन चाचणी सक्तीची इस्पितळात येणाऱ्या लोकांसाठी आता अँटीजेन चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. गोमेकॉतील सर्व डॉक्टरना आणि विभागप्रमुखांना अगदी गरज असणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना टप्याटप्याने करण्याची सूचना दिली आहे. सध्या मडगाव येथील कोविड रुग्णालयाची क्षमता २०० खाटांची असल्‍याचेही ते म्‍हणाले. त्‍यामुळे फोंडा इस्‍पितळाचा विचार केल्‍याचेही ते म्‍हणाले.

डॉक्‍टरांनाही झाला संसर्ग रविवारी ज्‍या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, त्‍यामध्‍ये चोडण येथील ५० वर्षीय पुरुष, नवेवाडे येथील ८४ वर्षीय महिला आणि ताळगाव येथील ७७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, २३ डॉक्टर आणि १८ परिचारिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्‍यातील १२ जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्र्यांनी दिली.

गरज असेल तरच इस्पितळात जा राज्यातील कोरोनाची परिस्‍थितीशी दोन हात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत सरकारही कार्यरत आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे इस्पितळांवर भार येत आहे. रुग्‍णांवर उपचार करताना विविध प्रकारची जबाबदारी प्रोटोकॉलनुसार पार पाडावी लागत आहे. त्यामुळे गरज असेल आणि तातडीची आवश्यकता असेल तरच इस्पितळात जा. आम्ही होम आयसोलेशन या पद्धतीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असून त्यासंदर्भात जनजागृतीही करण्यात येत आहे.

-विश्‍वजित राणे, आरोग्‍यमंत्री मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी एक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला क्वारंटाईन केले आहे. २१६६ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २२९४ जणांचे अहवाल हाती आहेत. राज्यात २६४२ कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आहेत. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ६ रुग्ण आहेत. डिचोलीत २९, साखळीत ७६, पेडणेत ५४, वाळपईत १०४, म्हापसा येथे ९७, पणजीत ९५, बेतकी येथे २०, कांदोळीत ७१, कोलवाळ येथे ५६, खोर्लीत ६८, चिंबल येथे १०९, पर्वरीत ६०, काणकोणात २४, मडगावात २२९, वास्कोत ३९५, लोटलीत ४२, मेरशीत ३९, केपेत ५२, धारबांदोड्यात ९५, फोंड्यात १७२ आणि नावेलीत ५६, आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

संपादन : महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com