फोंडा
हणजूण येथील रेव्ह पार्टीप्रकरणी सखोल चौकशी करून या पार्टीशी संबंधित राजकारण्यांची "पोलखोल' करण्याची खरी गरज आहे, त्यासाठी या रेव्ह पार्टीची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी बांदोड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
रेव्ह पार्टीशी संबंधित कपिल झवेरी याचे लागेबांधे गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोचले असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी छापलेल्या फोटोंमुळे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार या फोटोत दिसत असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्यास खरे काय ते उघड होईल, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. पणजीतील एका पंचतारांकित हॉटेलात आपण पत्रकार परिषदेला गेलो असताना त्यावेळेला कपिल झवेरी तसेच इतरांसोबत गोव्यातील भाजपशी संबंधित काही राजकारणी तेथे दिसले होते. या हॉटेलची त्या दिवसाची संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित लिंक तपासल्यास सत्य काय ते समोर येईल, असेही सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
गोव्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस व आता भाजपमुळे अंमली पदार्थाचा व्यवहार वाढला आहे. युवक व्यसनाधीन होत आहे, त्याची जबाबदारी या लोकांवरच राहणार असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून बळींचा आकडा येत्या पंधरा दिवसांत दोनशेवर गेला तर आश्चर्य वाटायला नको, असे सांगताना सरकार याप्रकरणी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. आपण वेळोवेळी कोविडसंबंधी सरकारला सूचना केल्या होत्या, पण त्याकडे काणाडोळा करण्यात आला, त्यामुळेच आज ही परिस्थिती ओढवली आहे. फोंड्यातील आयएमएच्या सदस्यांनी दिलासा हॉस्पिटल सरकारला वापरण्यास दिल्याने या सदस्यांचे अभिनंदन करताना सरकारने दिलासा व्यवस्थापनाला किमान पंचवीस लाख दिले असते तर दिलासाशी संबंधित डॉक्टरांकडूनही रुग्ण तपासणीसाठी अधिक सोयिस्कर ठरले असते, असे सांगून डॉक्टर व परिचारिकांची मिनिनो हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती, मात्र या हॉटेलचे बीलच सरकारकडून फेडले नसल्याने या लोकांना जुने गोवे येथील रेसिडेन्सीमध्ये हलवण्याची नामुष्की प्रशासनावर आल्याचा आरोप सुदिन ढवळीकर यांनी केला. सरकारी अधिकारी चांगले काम करीत असले तरी सरकारकडून निधी दिला जात नाही. सरकारकडे पैसेच नसल्याने ही नामुष्की ओढवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या मतदारसंघात फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या वसतीगृहात तसेच टुरिस्ट रेसिडेन्सीमध्ये कोरोनासंबंधी निगा केंद्रे सुरू केली असली तरी त्यात कोणतीही सुविधा रुग्णांना दिली जात नाही. काल (सोमवारी) गायब झालेला वीजपुरवठा रात्री उशिरा आला. त्यामुळे रुग्णांत गोंधळ उडाला. वीज नसल्याने डासांच्या उपद्रवाला रुग्णांना सामोरे जावे लागले. या डासांमुळे कोरोनासोबत मलेरियासारखे रोगही उद्भवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. याशिवाय जेवणाखाण्याचे आणि गरम पाण्यासाठीही रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगून खुद्द रुग्णांशी त्यांनी यावेळी फोनवरून संपर्क साधून पत्रकारांसमोर सत्य काय ते सांगा असे सूचवल्यावर रुग्णांनी सत्य परिस्थिती कथन केली. गुरांना कोंबल्याप्रमाणे रुग्णांना ठेवले जात असल्याचा आरोप करून कोविडसंबंधी उपचारासाठी आयुर्वेदिक, होमियोपथी डॉक्टरांसह परिचारिकांना सरकारने सेवेत घेतले असले तरी त्यांना पुरेसे वेतन देण्याबरोबरच त्यांच्या सेवेची हमी सरकारने द्यायला हवी, असे त्यांनी सूचवले.
दरम्यान, आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून फोंडा पालिका व बांदोडा पंचायतीतर्फे फोंडा नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, बांदोडा सरपंच रामचंद्र नाईक, पंच वामन नाईक यांच्या सहकार्याने फर्मागुढी कोविड निगा केंद्र परिसरात डास निर्मूलनासाठी फॉगिंग केले आहे.
राज्यपालांची बदली अन्यायकारक!
गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक हे सत्यवादी आहेत. आपण राज्यपालांची एका विषयासंबंधी भेट घेतली असता त्यांनी स्पष्टपणे वक्तव्य केले. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाबद्दलही त्यांनी सरकारला सुनावले होते. इतर विषयांबाबतही राज्यपालांनी मुख्यमंत्री व इतरांचे कान टोचले होते, त्यामुळे सत्य काय ते बोलणाऱ्या राज्यपालांची अचानक सरकारने बदली केली, ही बदली अन्यायकारक असून आमदार फोडाफोडी व इतर प्रकरणांना राज्यपालांकडून योग्य सहकार्य मिळण्याची अपेक्षा नसल्याने ही बदली केली गेल्याचा आरोप सुदिन ढवळीकर यांनी केला.
पालिकेत आमच्याकडे सातजण...!
फोंडा पालिकेचे राजकारण कुठल्या कुठे पोचले आहे. फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षाने राजीनामा दिला असला तरी मगोचे सात समर्थक नगरसेवक आहे. आठवी एक महिला नगरसेवकही मगो पक्षाशी संबंधित आहे, मात्र ती सध्या दूर आहे. त्यामुळे नगराध्यक्षाच्या शर्यतीत इतरांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गरज भासल्यास नगराध्यक्षपदासाठी मगोचे समर्थक नगरसेवकच दावा करू शकतात, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
|