Restaurants in Goa:गौरी आणि सुहानचं 'पेस्ट्री कॉटेज'

आपोआप गौरी धेंपो - कारकल ही आणि तिच्या ' पेस्ट्री कॉटेज 'चं नाव डोळ्यासमोर आलं. पेस्ट्री कॉटेजमध्ये केक घ्यायला म्हणून गेले आणि साक्षात गौरीच तिथे भेटली.
Restaurants in Goa: Gauri and Suhan Pastry Cottage

Restaurants in Goa: Gauri and Suhan Pastry Cottage

Published on
Updated on

डिसेंबर महिना आणि केकचं सुंदर नातं आहे, असं मला कायम वाटतं. प्रत्येक फुलाचा बहरण्याचा एक काळ, ऋतू ठरलेला असतो, तसा केकसाठी डिसेंबर महिना अगदी योग्य वाटतो. हा महिना सुरु होतो आणि वेध लागू लागतात ख्रिसमसचे. चवथ आणि दिवाळीच्या आधी जी घराघरात लगबग दिसते तशीच लगबग इथल्या कॅथलिक घरांमध्ये दिसू लागते. घराची साफसफाई, सजावट यात सारी मंडळी व्यस्त होऊन जातात तर घरातली बच्चे कंपनी गोठा सजवण्यात मग्न होतात. खास ख्रिसमससाठी म्हणून घराघरात केक आणि त्यापेक्षा मोठ्या निगुतीनं पारंपरिक पदार्थ बनवले जातात. केक आणि इथं खास ख्रिसमससाठी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना छान व्यावसायिक रूप कोणी दिलं आहे याच्या मी शोधात होते. आपोआप गौरी धेंपो - कारकल ही आणि तिच्या ' पेस्ट्री कॉटेज 'चं नाव डोळ्यासमोर आलं. पेस्ट्री कॉटेजमध्ये केक घ्यायला म्हणून गेले आणि साक्षात गौरीच तिथे भेटली. ख्रिसमससाठी तयार केलेले केक आणि वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांची मांडणी करण्यात ती मग्न होती. येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाला ती ख्रिसमसच्या निमित्ताने बनवलेल्या पदार्थांबद्दल माहिती देत होती. गौरीला कधीतरी भेटायचंच  होतं, तिच्याशी  छान गप्पा मारायच्या होत्या. पण अशी न ठरवता अचानक झालेली भेट ही कायम छान वाटते.  गौरीच्या नावात 'धेंपो' असले तरी गौरीनं स्वतःच्या हिंमतीवर, मोठ्या कर्तृत्वाने नाव कमवलंय. अर्थातच हे सगळं करत असताना तिला तिच्या नवऱ्याची सुहान कारकल यांची तेवढीच  भक्कम साथ मिळाली आहे.  

<div class="paragraphs"><p>Restaurants in Goa: Gauri and Suhan Pastry Cottage</p></div>
Restaurants in Goa: 'सिनामोन'ची भाटकार थाळी

'पेस्ट्री कॉटेज' नावाच्या यशामागे गौरी आणि तिचे यजमान सुहान कारकल यांचे मोठे कष्ट आहेत. तुम्हाला गोव्यातील केकमधली अस्सल चव चाखायची असेल तर पेस्ट्री कॉटेज हे एकदम खात्रीशीर ठिकाण आणि सध्याचा ख्रिसमसचा काळ तर यासाठी अगदी सुयोग्य असा काळ आहे. गौरी आणि सुहान यांनी 1994 साली सुरु केलेल्या पेस्ट्री कॉटेजला दोन वर्षानंतर म्हणजे 2014ला तीस वर्ष पूर्ण होतील. हल्ली आपण 'स्टार्टअप' हा व्यवसायाशी संबंधित शब्द अनेकदा ऐकतो. पण अठ्ठावीस वर्षांपूर्वी गौरी आणि सुहान यांनी पेस्ट्री कॉटेज सारखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवून दाखवली तो त्याकाळचा स्टार्टअपच होता. गौरी आणि सुहान दोघेही कल्पक वृत्तीचे आहेत. 1994 साली दोघेही कॉलेजमध्ये शिकत होते आणि एकमेकांच्या प्रेमात म्हणजे आजच्या भाषेत एकमेकांना 'डेट' करत होते. याच काळात 'पेस्ट्री कॉटेज'ची कल्पना दोघांच्या मनात आली. 'आम्ही एकमेकांना डेट करत होतो आणि मग कधी पणजीमध्ये कॉफी प्यायला मित्र - मैत्रिणीसोबत जायचो. त्यावेळी मला अतिशय उत्तम अशा पेस्ट्री शॉपची उणीव भासायची. पणजीत त्याकाळी मांडवी हॉटेलमध्ये 'पेस्टेलेरिया' नावाचं एकमेव पेस्ट्री शॉप होतं. पण तेवढंच पुरेसं नव्हतं. पेस्ट्री - केक - पफमधले खूप चविष्ट पर्याय देणारं एखादं छानसं पेस्ट्री शॉप असलं पाहिजे असं मला कायम वाटायचं. मी भरपूर प्रवास करायचे. वेगवेगळ्या ठिकाणी मिळणारे पदार्थ खाणं हा माझा आवडता छंद. प्रदेशातील कॅफे - पेस्ट्रीची दुकानं बघितली की हे असं आपल्या गोव्यात असायला हवं असं वाटायचं. लोकांना एका छताखाली छान बसून तऱ्हेतऱ्हेच्या पेस्ट्री - केक खायला मिळायला हवे याच उद्देशाने आम्ही ' पेस्ट्री कॉटेज ' सुरु केले.' पेस्ट्री कॉटेजच्या निर्मितीबद्दल गौरी अतिशय उत्साहाने बोलत होती.' आज मागे वळून बघताना असं वाटतं की मला काळाची गरज माहीत होती आणि ती गरज ओळखून नियोजन करणारा सुहान माझ्यासॊबत असल्याने पेस्ट्री कॉटेज सुरू करण्याचा आमचा निर्णय योग्यच होता.' हे सगळं सांगताना तिच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसत होतं. अवघ्या एकोणिसाव्या वर्षी गौरी आणि सुहान यांनी ' पेस्ट्री कॉटेज ' सुरु केलं. आज पणजीमध्ये त्यांच्या चार शाखा आहेत. दोघेही पेस्ट्री कॉटेजच्या माध्यमातून सतत नवनवीन कल्पना राबवत असतात.

ख्रिसमस स्पेशल

ख्रिसमससाठी खास बनवले जाणारे केक आणि पारंपरिक पदार्थ आपल्या पेस्ट्री कॉटेजमधून लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी गौरी गेल्या महिन्यापासून व्यस्त आहे. ख्रिसमस म्हटले की प्लम केक हा हवाच. पेस्ट्री कॉटेजमध्ये याच 'प्लम केक'ला प्रचंड मागणी असते. याच रिच प्लम केकची मागणी पुरी करण्यासाठी गौरी खूप आधीपासून तयारीला लागते. 'रिच प्लम केक'साठी एक वर्ष आधी रममध्ये मनुका भिजवून ठेवाव्या लागतात. म्हणजे प्लम केकची तयारी एक वर्ष आधीपासून सुरू होते तेव्हा कुठे तो आपल्याला ख्रिसमसला खायला मिळतो. आपण कल्पना करू शकणार नाही इतके प्लम केक या काळात बनवले जातात. याशिवाय दोस, दोंदल, फोकाद, पेरांद, बातीका, बेबिन्का, ख्रिसमस पुडिंग, बॉलॅरोंज सारखे पारंपरिक पदार्थ पेस्ट्री कॉटेजमध्ये मिळतात. या सगळ्या वरून लक्षात येईल की याकाळात गौरी किती व्यस्त असते. ख्रिसमससाठी बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ घराघरात बनवले जातात, पण पर्यटकांना हे पदार्थ मिळायला हवेत शिवाय अनेक नोकरदार महिला आहेत ज्यांना हे सारे पदार्थ बनवायला वेळ नाही अशांसाठी गौरीने मुद्दाम पुढाकार घेतला. पेस्ट्री कॉटेजमध्ये गौरी आणि सुहान यांनी गिफ्ट हॅम्पर बनवून लोकांचं आणखी एक काम सोपं केलंय. ख्रिसमसला द्याव्या लागणाऱ्या भेटवस्तूंमध्ये पेस्ट्री कॉटेजमधील 'गिफ्ट हॅम्पर' अतिशय उपयोगी ठरतंय. सध्या गिफ्ट हॅम्परला देखील मागणी आहे.

<div class="paragraphs"><p>Restaurants in Goa: Gauri and Suhan Pastry Cottage</p></div>
Restaurants In Goa: 'राईथ' नव्या जुन्याचा संगम

गौरी आणि सुहानच्या पेस्ट्री कॉटेजने केक आणि पेस्ट्रीच्या विभागात क्रांती घडवून आणलीय . मेक्सिकन टिक्का रोल आणि चिकन रोल यांसारख्या अनेक नवीन पदार्थांची निर्मिती या दोघांनी पेस्ट्री कॉटेजच्या माध्यमातून केली. आज ज्या पद्धतीची विविधता पेस्ट्री कॉटेजमध्ये मिळते तशी अन्य कुठेच मिळत नाही. आधुनिक आणि पारंपरिक पदार्थ यांचा सुंदर मेळ गौरीने यात घातलेला दिसून येतो. लोकांच्या गरजा ओळखून त्या पद्धतीने उत्पादन निर्मिती करण्याचं कौशल्य गौरी आणि सुहान कारकल या दोघांकडे असल्याने आज हे दोघे घट्ट पाय रोवून केक आणि पेस्ट्री निर्मिती व्यवसायात उभे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com