Mohandas Sukhtankar Passed Away : ज्येष्ठ गोमंतकीय रंगकर्मी मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी बरीच वर्षं नाट्यसेवा केली होती. ‘द गोवा हिंदू असोसिएशन’ला सुखटणकर यांच्या आजवरच्या नाट्यप्रवासात मोठं स्थान होतं. या संस्थेमध्ये कलाकार म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांना कार्यकर्त्याच्या भूमिकेत जात नाट्यक्षेत्रासाठी भरीव योगदान दिलं आहे.
मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी झाला होता. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्यातील एक नामांकित डॉक्टर होते. डॉक्टरकीला व्यवसायाचं रुप न देता त्यांनी निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य म्हणूनच रुग्णांची वैद्यकीय सेवा केली. मोहनदास यांची आईही स्वतंत्र विचारांची असल्यामुळे त्याचा पगडा त्यांच्यावर पडला.
रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका ही विशेष गाजली होती. यासोबतच कैवारी, जावई माझा भला या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी वढवलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या.
मोहनदास सुखटणकर यांचे बालपण गोव्यामध्ये गेलं. त्यांनी पहिली भूमिका म्हापशातील सारस्वत विद्यालयात शिकत असताना इयत्ता दुसरीत असताना साकारली होती. त्यांनी काम केलेल्या या पहिल्या नाटुकलीचे नाव खोडकर बंडू होतं. मोहनदास आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे परिचित होते. वर्गात सतत बडबड करत असल्याचं निमित्त पाहून शिक्षकांनी त्यांना नाटुकलीमध्ये अभिनयाची संधी दिली. शिक्षेपोटी मिळालेल्या या भुमिकेपासून सुखटणकरांचा रंगभूमीवरील प्रवास सुरु झाला.
सुखटणकरांनी नाटुकलीत खोडकर बंडूचं मुख्य पात्र रंगवून बक्षीस पटकावले. याच नाटुकलीमुळेच मोहनदास सुखटणकरांमध्ये नाटकाची आवड निर्माण झाली. तब्बल पन्नासहून अधिक वर्ष नाट्यक्षेत्राची सेवा बजावणाऱ्या मुंबईच्या आम्ही गोवेंकर संस्थेकडून त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.