म्हापसा: गोव्याचे शिल्पकार, भाग्यविधाते तथा मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांच्या मिरामार येथील समाधी स्थळाचे दुरुस्ती व सुशोभिकरण येत्या १२ मार्चपर्यंत सरकारने करावे, अन्यथा राज्यभर झोळी फिरवून समाधी स्थळाची दुरुस्ती करू, असा इशारा म्हापसा शहरातील भाऊप्रेमींनी भाऊंच्या ५१व्या पुण्यतिथीदिनी अभिवादन केल्यानंतर बोलताना दिला.
भाऊसाहेबांना अभिवादन करण्यासाठी कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य श्याम कवठणकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, माजी नगरसेवक तुषार टोपले, मगोप केंद्रीय समिती सदस्य भारत तोरस्कर, भाई मोये, एकनाथ म्हापसेकर, गितेश डांगी, देश किनळेकर, प्रेमानंद दिवकर, अॅड. महेश राणे, विनायक दिवकर, रमेश मणेरकर, नरेंद्र नाईक, हेमंत दिवकर, विलास पिळणकर, महेश शिरगांवकर आदी भाऊप्रेमी उपस्थित होते.
प्रा.श्याम कवठणकर म्हणाले की, भाऊंना गोमंतकीय जनतेने ‘भाग्यविधाते’ ही पदवी दिली. त्यांनी गावागावांत शिक्षणाची गंगा आणली, म्हणून आम्ही आज उच्च शिक्षित होऊ शकलो. भाऊ हे प्रत्येकांच्या मनात आहे. सुधीर कांदोळकर म्हणाले की, भाऊंनी स्वतः निवडणूक न लढवता ‘मगोप’चे सरकार आणले.
गोव्याचे भाग्यविधाते भाऊंच्या समाधीची दयनीय अवस्था करून ठेवल्याचे पाहून अतिशय खंत वाटते. ‘मगोप’च्या सर्व आजी-माजी आमदारांनी आपल्या मानधन व निवृत्ती वेतनातून या समाधीची दुरुस्ती करायला हवी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.