
पणजी: गेल्या तीन वर्षांत राज्यातील १५ वर्षे पूर्ण झालेल्या २८,११० वाहनांचे नूतनीकरण करण्यात आले, तर अशा १,८९,६७० वाहनांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून स्पष्ट केले आहे.
आमदार जीत आरोलकर यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या किती वाहनांच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्रे आणि पासिंगचे नूतनीकरण झालेले आहे तसेच किती वाहनांच्या अशा कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही, त्यात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, व्यावसायिक, अवजड वस्तूंची वाहतूक करणारी, बसेस आणि इतर वाहनांची संख्या किती आहे, असे प्रश्न आमदार आरोलकर यांनी विचारले होते.
त्यावर मंत्री गुदिन्हो यांनी २०२२-२३ मध्ये १०,४५४, २०२३-२४ मध्ये ९,८८३ आणि २०२४-२५मध्ये ७,७७३ अशा एकूण २८,११० वाहनांचे नूतनीकरण करण्यात आल्याचे म्हटले आहे. तर, नूतनीकरण न झालेल्या वाहनांची आकडेवारीही त्यांनी सादर केली आहे.
१२,६०,३४५ वाहनांची नोंद
राज्य वाहतूक खात्याकडे आतापर्यंत १२,६०,३४५ वाहनांची नोंद झालेली आहे. त्यात कंपन्यांच्या वाहनांची संख्या २७,५८१ इतकी आहे, असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी आमदार संकल्प आमोणकर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे.
सर्वाधिक पर्यटक टॅक्सी म्हापशात
राज्यात १५,८७३ पर्यटक टॅक्सींची नोंद झाली असून, सर्वाधिक पर्यटक टॅक्सींची नोंदणी म्हापशात (६,१५७) झाली आहे. त्यानंतर पेडणे (२,१६९), पणजी (१,९२३), वास्को (१,९२१), मडगाव (१,६४७), काणकोण (५६४), डिचोली (५४२), फोंडा (५३५) केपे (३२४) आणि धारबांदोडा (९१) या विभागांचा क्रमांक लागतो, असेही मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.