
कोलवाळ येथे चार भंगार अड्डयांना लागलेल्या आगीमुळे वास्को येथील भरवस्तीतील भंगार अड्डेही चर्चेत आले. त्यामुळे हे भंगार अड्डे शहराबाहेर हलविण्यात यावेत, अशी मागणी आता स्थानिकांकडून होत आहे. राज्यात असणारे भंगार अड्डे किती वैध व किती अवैध आहेत याची माहिती कोठेही उपलब्ध नाही.
भरवस्तीमध्ये असलेले भंगार अड्डे धोकादायक आहेत. याप्रकरणी मुरगाव पालिका व इतर संबंधित सरकारी यंत्रणेने गंभीर दखल घेत हे भंगार अड्डे शहराबाहेर हलविण्याची गरज आहे. जेणेकरून ते आपला व्यवसायही करू शकतील व नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवणार नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी व्यक्त केली.
यापूर्वी बायणा भागात भंगार अड्डे पाहण्यास मिळत होते. परंतु, आता भंगार अड्ड्यांनी दुसरीकडे पाय पसरले आहेत. त्यामुळे मांगोरहिल, शहर भागात, शांतीनगर तसेच इतर ठिकाणी भंगार अड्डे उदयास आले आहेत. यापैकी बहुतांश भंगार अड्डे हे वस्तीमध्येच आहेत. या भंगार अड्ड्यांमध्ये येणाऱ्या भंगार वस्तू कापण्यासाठी काहीवेळा वेल्डिंगचा वापर करण्यात येतो. त्यावेळी खबरदारी घेणे गरजेचे असते.
या भंगार अड्ड्यांपैकी किती भंगार अड्ड्यांमध्ये अग्निप्रतिबंधक सिलिंडर व इतर सामुग्री उपलब्ध आहे, याचीही माहिती कोठेही उपलब्ध नाही. इतरांना जर व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर त्याला अग्निशमन दलाकडून ना हरकत परवाना घ्यावा लागतो. या भंगार अड्डयांना तसा परवाना देण्यात आला की काय असा प्रश्न पडत आहे. जर देण्यात आला असेल तर भर वस्तीमध्ये असलेल्या भंगार अड्डयांना कोणत्या आधारावर तो देण्यात आला याचे स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे.
यापूर्वी मुरगाव पालिकेने शहर भागातील भंगार अड्डे शहराबाहेर हलविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू काही कायदेशीर गोष्टींमुळे सदर प्रयत्न फसला. त्यावेळी या अड्ड्याविरोधात नागरिकांनी आवाज उठविला होता. परंतू तो आवाज नंतर पुन्हा ऐकण्यास मिळाला नाही.
२०१४ मध्ये वस्तीतील भंगार अड्डे शहराबाहेर हलविण्यासंबंधी संबंधितांना नोटीस देण्यात आल्या होत्या. परंतु पुढे कोणतीही कारवाई मात्र झाली. त्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी मुरगाव पालिकेला निवेदन देऊन सदर भंगार अड्डे शहराबाहेर हलविण्यासंबंधी विनंती केली होती. त्या निवेदनाची दखल घेताना तत्कालीन नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांनीही तत्कालीन यांना भंगार अड्डयांचा सर्वे करण्याची सूचना केली होती. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे अद्यापही गुलदस्तातच आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.