पारशी समाजाच्या (Parsi Society) अनेक धुरंधरांनी कायदा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला, संगीत, राजकारण, विज्ञान, व्यवस्थापन, हवाई वाहतूक आदी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे. देशाचे पहिले फिल्ड मार्शल (Field Marshal) हा किताब मिळविणारे सॅम माणेकशॉदेखील ह्याच समाजाचे होते.
बांगला देश युद्धाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. ह्या युद्धाबरोबर ज्याची प्रकर्षाने आठवण होते ती फिल्ड मार्शल जनरल माणेकशॉ ह्यांची. चाळीस वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांना पाच युद्धाना सामोरे जावे लागले होते, पण आपल्या कारकिर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा लवलेशही चिकटू दिला नाही असे सॅम माणेकशॉ. युद्धरणनीतीची उत्तम जाण, अभ्यास, व्यूहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असतानादेखील जोपासलेली विनोदबुद्धी आणि कोणत्याही वयाच्या माणसाशी सहृदय वर्तन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांनी निश्चितच अनुभवले असतील.
केवळ 18 दिवसांत पाक लष्कराला शरणागती पत्करायला लावणारे धडाडीचे, करारीचे व्यक्तिमत्त्व असे त्यांचे वर्णन करता येईल. काही व्यक्तिमत्त्वे त्या त्या घटनेशी जोडलेली असतात. कुरियन म्हटले की, अमूल दुधाची आठवण होते, क्रिकेट म्हटले की सचिन तेंडुलकर स्मरतो.तद्वत बांगला युद्ध आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे समीकरण आपण दूर करू शकत नाही. पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात 3 एप्रिल 1914 ह्या दिवशी जन्मलेले माणेकशॉ भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. सातव्या शतकात अरबांनी पर्शिया जिंकला तेव्हा तिथले रहिवासी असलेले पारशी भारतात आले. झरतृष्ट यांचा अनुयायी असलेला हा समाज पर्शियन भाषा बोलत असे. आपल्या चालिरीती, जीवनपद्धती त्यांनी सांभाळून ठेवल्या आहेत. ह्या समाजाच्या अनेक धुरंधरांनी कायदा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला, संगीत, राजकारण, विज्ञान, व्यवस्थापन, हवाई वाहतूक आदी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे. टाटांचे उदाहरण पुरेसे आहे.
देशाचे पहिले फिल्ड मार्शल हा किताब मिळविणारे माणेकशॉदेखील ह्याच समाजाचे होते. ते आपल्या देशाचे आठवे सैन्य प्रमुख राहिले. त्यांचे कुटुंब मूळचे बलसाड गुजरात येथील होते. लग्नानंतर सॅमचे आई वडील अमृतसरला आले त्यामुळे माणेकशॉचे शालेय शिक्षण अमृतसरला झाले व महाविद्यालयीन शिक्षण शेरवूड कॉलेजमध्ये झाले . वडिलांची इच्छा होती आपल्याप्रमाणे आपल्या मुलाने डॉक्टर (Doctor) व्हावे त्यासाठी ते लंडनला जाऊन शिकायला तयार होते पण त्यांना तिथे पाठविले गेले नाही आणि वडिलांच्या विरोधात जाऊन नव्याने सुरू झालेल्या देहराडूनच्या भारतीय मिलिटरी अकादमीत त्यांनी प्रवेश घेतला. 1934 मध्ये तत्कालीन ब्रिटिश लष्करात सेकंड लेफ्टनन्टपदी त्यांची नियुक्ती झाली.
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्यावतीने लढताना बर्माच्या सिटांग मोहिमेवर ते जबर जखमी झाले होते त्यांच्या अंगात त्यावेळी नऊ गोळ्या घुसल्या होत्या. पण मोहीम यशस्वी झाली होती. मेजर जनरल डेव्हिड कोवाननी त्यांना वाचविले होते.अर्थात त्यांचा ऑर्डर्ली शिपाई शेरसिंग यालाही श्रेय द्यायला हवे. कारण त्यानेदेखील तातडीने सॅमना रेजिमेंटल एड पोस्टमध्ये तेव्हा नेले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण 1971 युद्ध जिंकलो. त्यावेळी इंदिराजी पंतप्रधान होत्या. माणेकशॉना इंदिराजींनी युद्धासंबंधी विचारायला बोलावले. त्यावेळी ह्या कणखर फिल्ड मार्शलने त्यांना सांगितले की, लढाई करायची असेल तर लगेच सुरू करू पण जिंकायची असेल तर मला वेळापत्रक ठरवू द्या. इंदिराजींनी त्यांचे ऐकले व पूर्ण तयारीनिशी आपण युद्ध केले व अवघ्या 18 दिवसात बाजी मारली. इंदिराजींनी त्यावेळी सॅमना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.
सॅमना लष्करात राजकीय मंडळींनी केलेली ढवळाढवळ मुळीच पसंत नव्हती. पाकिस्तानला (Pakistan) अमेरिकेचा पाठिंबा असूनही आपण पाकला खडे चारले होते. शरणागतीने युद्ध संपले. युद्धकैद्याना निरनिराळ्या छावण्यांमध्ये ठेवलेले होते व नियमानुसार त्यांना सर्व सवलती दिल्या जायच्या. पण तरीही कावेबाज पाक मात्र कैद्यांना अतिशय वाईट वागणूक मिळते असा खोटा प्रचार करू लागले.
अलिबागचे अरुणकुमार वैद्य, कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यातील कोडगू गांवातले फिल्ड मार्शल कोदंडरा मडप्पा करिअप्पा आता बांगला देशात असणाऱ्या पबना जिल्ह्यातील चट मोहरचे जयन्तनाथ चौधरी, कर्नाटकचे कोदन्डरा सुबय्या थिमय्या ही ह्या पदावरची अन्य व्यक्तिमत्त्वे. प्रत्येकाने भारताच्या उज्वल, साहसी परंपरेत आपापले योगदान दिले आहे परंतु ह्यात माणेकशॉ ह्यांची कारकीर्द अधिक उजळून गेली, कारण त्यांनी बांगला देश निर्मितीवेळी अवघ्या 18 दिवसांत पाकला पराभूत केले होते. ह्या पराक्रमी योद्ध्याचे निधन वेलिंग्टनच्या सैनिकी रुग्णालयात 27 जून 2008 साली वयाच्या 94वर्षी झाले.
रामदास केळकर
धिरोदात्त सेनानी सॅम माणेकशॉ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.