Goa Congress: आधी 1460 कोटींची थकबाकी वसूल करा मग ओव्हरलोडची तपासणी; अमरनाथ पणजीकर

Goa Congress On Power Minister: वरील सर्व श्रेणीतील थकबाकीदारांची एकूण रक्कम 1460.81 कोटी आहे आणि ती 2018-19 पासून प्रलंबित आहे - पणजीकर
आधी 1460 कोटींची थकबाकी वसूल करा मग ओव्हरलोडची तपासणी; अमरनाथ पणजीकर
Amarnath PanjikarDainik Gomantak

वीज विभागाच्या व्यावसायिक, औद्योगिक आणि सरकारी कार्यालयातील ग्राहकांकडून 1460 कोटींची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. वीज खात्याचे मंत्री रामकृष्ण उर्फ ​​सुदिन ढवळीकर यांनी सामान्य लोकांच्या वीज ओव्हरलोडची तपासणी करण्यापूर्वी या थकबाकीदारांकडून रक्कम वसूल करण्यासाठी प्रथम पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेस माध्यम विभाग प्रमूख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सोनल मालवणकर आणि महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सई वळवईकर यांच्यासह काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमरनाथ पणजीकर यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे थकबाकीदार उद्योगपती आणि धनाड्य वीज ग्राहकांना संरक्षण देत आहेत आणि गरीब जनतेवर हल्ला करत आहेत असा आरोप केला.

व्यापारी ग्राहक श्रेणी अंतर्गत सुमारे 14,000 वीज बिल थकबाकीदार, 635 औद्योगिक श्रेणी अंतर्गत वीज बिल थकबाकीदार, 2669 सरकारी कार्यालये, महामंडळे, अनुदानित संस्था इत्यादी अंतर्गत वीज बिल थकबाकीदार आहेत आणि सुमारे 3480 थकबाकीदार आहेत ज्यांचे एक लाख पेक्षा जास्त वीज बिल आहे.

या वरील सर्व श्रेणीतील थकबाकीदारांची एकूण रक्कम 1460.81 कोटी आहे आणि ती 2018-19 पासून प्रलंबित आहे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी जुलै 2023 मध्ये गोवा विधानसभेत दिलेल्या उत्तरांचा दाखला देवून केला.

आधी 1460 कोटींची थकबाकी वसूल करा मग ओव्हरलोडची तपासणी; अमरनाथ पणजीकर
Goa Monsoon 2024: सहा घरांत पाणी घुसले, डिचोलीत रस्त्यावर दरड कोसळली; गोव्यात चार दिवस 'यलो अलर्ट'

सरकारने 2019 ते 2023 पर्यंत वीज वितरण प्रणालीवर 12,000 कोटी खर्च केले आहेत परंतु वीज पुरवठा खंडीत होणे चालूच आहे. अलीकडे, वेर्णा आणि इतर औद्योगिक वसाहतींना जवळपास 3 दिवस वीजपुरवठा खंडित झाला.

उद्योगांना ही समस्या सातत्याने भेडसावत आहे. घरांनाही अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. म्हापसा सारख्या शहरांना वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

2019 पासून आजपर्यंत सुमारे 75 जणांचा विद्युत शॉकमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. गोमातेसह जवळपास 50 जनावरे विजेच्या धक्क्याने दगावल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

सुदिन ढवळीकर हे गोव्यातील विविध भागात अंडरग्राऊंड केबल घालण्याच्या कामाबद्दल बोलतात.

गोव्यातील विविध भागात पावसाळ्यात रस्ते पूर्ववत करण्याकडे विद्युत विभागाच्या पूर्ण दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेला जो धोका निर्माण झाला आहे, त्याला जबाबदार कोण आहे, हे सुदिन ढवळीकरानी सांगावे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे खोदून कुंपण न लावता उघडे ठेवल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com