Goa Iffi 2024
पणजी: इफ्फीसाठी यंदा चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि चित्रपट तज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे. शनिवारपर्यंत महोत्सवासाठी तब्बल ३,६५९ जणांनी नोंदणी केली आहे. यापुढेही नोंदणी होईल. ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आधीच महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. त्यामुळे यावर्षी विक्रमी संख्येने प्रतिनिधींची नोंदणी होण्याची शक्यता आहे.
२० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची तयारी सध्या सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रतिनिधी नोंदणीत मोठी वाढ झाली आहे.
या ३,६५९ प्रतिनिधींमध्ये देश-विदेशातील चित्रपट अभ्यासक, चित्रपटप्रेमी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, यंदाचा इफ्फी प्रचंड यशस्वी ठरणार आहे. याव्यतिरिक्त माध्यम प्रतिनिधींनीही या महोत्सवाच्या वृत्तांकनासाठी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. यात डिजिटल मीडियाचे ३०, मीडिया कॅमेरापर्सन ३३ तर मीडिया प्रतिनिधी म्हणून १९० जणांनी नोंदणी केली आहे.
प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा ''पॉवर ऑफ फेल्यूर'' विषयावर कला अकादमीत २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत मास्टर क्लास होणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी एक खास पाहुणा म्हणून अनुपम खेर यांची उपस्थिती लाभणार आहे. अनुपम खेर यांनी ३५ वर्षांच्या काळात ५४० हून अधिक चित्रपट आणि १०० नाटकांमध्ये काम केले आहे.
यंदाच्या इफ्फीचे उदघाटन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियाला ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवडले गेले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.