म्हापसा : कोविडमुळे (Covid 19) तसेच त्यासंदर्भातील कामांत सरकारी कर्मचारी व्यग्र असल्याने गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून स्थगित झालेल्या स्वयंपूर्ण गोवा योजनेला (self-sufficient Goa scheme) पुन:कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने ‘स्वयंपूर्ण मित्र’ येत्या एक जुलैपासून पुन्हा गावोगावी तसेच शहरांत जाऊन कार्यरत होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली.
‘आत्मनिर्भर भारत : स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेच्या अनुषंगाने म्हापसा रोटरी क्लबने पुरस्कृत केलेल्या एकवीस शिवणयंत्रांचे अस्नोड्यातील महिलांना मोफत वाटप केल्यानंतर ते बोलत होते. अस्नोडा पंचायतीच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर, महसूल खात्याच्या अव्वल सचिव ईशा सावंत, बार्देशचे गट विकास अधिकारी मनेश हरी केदार, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्ष दीक्षा कांदोळकर, माजी सरपंच सपना मापारी, म्हापसा रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजित वाळके, प्रकल्प समन्वयक सचिन मेणसे व इशान उसपकर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. सावंत पुढे म्हणाले, अस्नोडा पंचायत क्षेत्रातील सरकारचे प्रतिनिधी या नात्याने ‘स्वयंपूर्ण मित्र’ म्हणून कार्यरत असलेल्या महसूल खात्याच्या अधिकारी ईशा सावंत तसेच बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांनी तन्मयतेने चांगल्यापैकी कार्य केल्यानेच हे शक्य झाले. अशाच प्रकारचे कार्य आता पुन्हा गोव्यातील अन्य १९१ पंचायती व १४ पालिका क्षेत्रांत होणार आहे. या योजनेच्या कार्यवाहीसाठी लोकांना जागृत करणे, प्रोत्साहित करणे, त्यांचे कौशल्य व सामर्थ्य यांबाबत जाणीव करून देणे अत्यंत गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री या वेळी नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.