खरी कुजबुज: रवी नाईक ‘लोकनायक’?

Khari Kujbuj Political Satire: गोव्‍यातील भाजपचे विविध आमदार आणि मंत्री महाराष्‍ट्रात होत असलेल्‍या विधानसभेच्‍या प्रचारासाठी गेलेले असतानाच येथे गोव्‍यात दररोज गोंय आणि गोंयकारपणाचा जयघोष करणारे गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई हेही सध्‍या महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर असल्‍याचे सांगितले जाते.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

रवी नाईक ‘लोकनायक’?

‘लोकनायक’ ही कृषिमंत्री रवी नाईक यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेली गाण्याची चित्रफीत सध्या सोशल माध्यमावरून चांगलीच ‘व्हायरल’ झाली आहे. खरे तर हे गाणे २०११ सालातले, रवी गृहमंत्री होते तेव्हाचे. आता त्यात काही भाग जोडून हे दृश्यगाणे परत एकदा युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याकाळी सर्व वाहिन्यांवरून प्रदर्शित झालेले हे गाणे बरेच ‘हिट’ ठरले होते. २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फोंडा मतदारसंघात तो प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दाही ठरला होता, पण आता निवडणुका जवळ नसूनसुद्धा ही चित्रफीत पुनर्प्रदर्शित केल्यामुळे रवी हे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित नसल्याचे तर या चित्रफितीच्या निर्मात्याला दाखवायचे नाही ना? अशी चर्चा फोंड्यात सुरू झाली आहे. काही का असेना पण सध्याच्या विधानसभेतील ज्येष्ठ आमदार असलेले रवी हे एक न संपणारा विषय असल्याचे हे गाणे सध्या दाखवून देत आहे एवढे मात्र नक्की. ∙∙∙

महाराष्‍ट्राच्या प्रचारात गोवा फॉरवर्ड

गोव्‍यातील भाजपचे विविध आमदार आणि मंत्री महाराष्‍ट्रात होत असलेल्‍या विधानसभेच्‍या प्रचारासाठी गेलेले असतानाच येथे गोव्‍यात दररोज गोंय आणि गोंयकारपणाचा जयघोष करणारे गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई हेही सध्‍या महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर असल्‍याचे सांगितले जाते. त्‍यांचे जवळचे सहकारी दुर्गादास कामत यांनी यासंबंधीचे छायाचित्र सध्‍या प्रसार माध्‍यमावर व्‍हायरल केले आहे. नाशिक क्षेत्रातील निफाड या मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनिल कदम यांच्‍या प्रचारासाठी सरदेसाई सक्रिय आहेत. महायुतीच्‍या उमेदवाराच्‍या विरोधात मतदान करा आणि पक्षबदलू गद्दारांना धडा शिकवा असे म्‍हणे विजयने मतदारांना आवाहन केले आहे. आता विजयच्‍या या आवाहनाचा कदम साहेबांना किती फायदा होईल हे या निवडणुकीच्‍या निकालानंतर कळू शकेल. ∙∙∙

पूजाची कोठडीयात्रा!

पैसे देऊन सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पूजा नाईक हिची सध्या कोठडीयात्रा चालल्याचे दिसते. लोक तीर्थयात्रेला जातात, परंतु आपल्या कर्मांमुळे पूजा कोठडीयात्रेवर निघाली आहे. प्रथम म्हार्दोळ पोलिस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर तेथे तिला पोलिस कोठडी मिळाली. तेथून सुटका झाल्यानंतर, डिचोली आणि आता पर्वरी पोलिसांनी तिला अटक करून आपल्या कोठडीचा अनुभव घेण्याची संधी दिली. नोकरी घोटाळ्यात दिवसेंदिवस एक नवीन उलगडा होत असल्याने पूजा संबंध गोव्यातील पोलिस ठाण्यांतील कोठडीचा अनुभव घेणार काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे, परंतु ती मात्र चुकीच्या कारणासाठी अशी चर्चा रंगलीय. ∙∙∙

रस्ते चकाचक हवेत? मान्यवरांना आमंत्रित करा!

‘सुपारीच्या निमित्ताने पानवेलीला पाणी’ अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे. जर एखाद्या मान्यवरांच्या आगमनाने चाळण झालेल्या रस्त्यावर डांबर पडत असेल, तर त्या मान्यवरांना राज्यातील प्रत्येक गावांत आमंत्रित करा. म्हणजे सगळेच रस्ते चकाचक होतील. आज शनिवारी पर्रा येथे सगळ्यात मोठी अशी आकाशकंदील स्पर्धा घेण्यात येणार आहे. आमदार मायकल लोबो व आमदार डिलायला लोबो यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल, खासदार, मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत. काणका ते पर्रा रस्ता पार उखडला होता, परंतु आता मान्यवर स्पर्धेसाठी येणार म्हणून तातडीने या सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करून रस्ता चकाचक करण्यात आला. आता जनता म्हणायला लागली आहे, जर मान्यवरांच्या आगमनाने रस्ते हॉटमिक्स होत असतील, तर आम्हीही आयोजित करू स्पर्धा आणि बोलवू मान्यवरांना. ∙∙∙

प्रतीक्षा कोणाची करता?

जुने गोवेला वगळून कदंब पठारमार्गे पणजीत येणाऱ्या महामार्गाच्या बगल रस्त्यावर चिंबल जंक्शनवर उभारलेला उड्डाणपूल पूर्ण होऊन व त्याची भार चाचणी आटोपून आता पंधरवडा उलटला आहे, पण अजून तो वाहतुकीसाठी खुला का केला जात नाही असा सवाल या रस्त्यावरील चिंबल जंक्शनवर रोजच लागणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहून अनेकजण करू लागले आहेत. सरकारने व स्वतः मुख्यमंत्र्यांनी जुने गोवेतील शवप्रदर्शनापूर्वी तो खुला केला जाईल असे यापूर्वी जाहीर केले होते. मग हा पूल पूर्ण होऊनही आता तो खुला करण्यासाठी वाट कोणाची पाहता? असा मुद्दा उपस्थित होणे साहजिकच आहे. कारण पूल पूर्ण होईपर्यंत लोकांनी कसाबसा धीर धरला, पण आता तो पूर्ण झाल्यावरही प्रतीक्षा करणे अनेकांना अशक्य बनलेले दिसते. रोज बसेस वा आपल्या वाहनांत बसून पुढे जाण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांना या एकंदर प्रकारात कोणाचे तरी हितसंबंध गुंतलेले असावेत असे वाटू लागले आहे. प्रत्येकाचा तसाच सूर असल्याचे एकंदर चर्चेवरून दिसून येते. लोकांना प्रत्येक रस्त्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगांचा आता कंटाळा आलेला आहे. प्रथम मांडवी पुलाचे बांधकाम, नंतर झुआरी पुलाचे व आता पर्वरीतील उड्डाणपुलाचे बांधकाम. त्यामुळे लागणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहून त्या कधीच संपणार नाहीत का? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. ∙∙∙

नोकऱ्यांचा बाजार

सरकारी खात्यामध्ये नोकरी विक्रीचा बाजार हा विषय तसा नवा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा बाजार सुरू आहे. आता एवढेच की या नोकऱ्यांसाठी हजारामध्ये नव्हे, तर लाखांमध्ये व्यवहार होऊ लागला आहे. या व्यवहाराला राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय तो शक्य नाही हे सर्वश्रुत आहे. काही मतदारसंघातील अपवाद वगळता बहुतेक मतदारसंघामध्ये नोकऱ्या देणारे दलाल हे आमदार व मंत्र्यांच्या अवतीभोवती पिंगा घालत असतात. त्यातून ते लोकांना आपण आमदार व मंत्री यांच्या किती जवळ आहोत त्याची छाप पाडण्याचा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे अनेक व्यक्ती पैसे घेऊन या दलालांकडे धाव घेतात व सरकारी नोकरी मिळेल या प्रतीक्षेत कितीही रक्कम देण्यास तयार असतात. निवडणूक आल्यावर प्रत्येक उमेदवार असलेला आमदार किंवा मंत्री माझ्या काळात अनेकजणांना नोकऱ्या दिल्या असे सांगत असतात, त्याला काय म्हणावे. अशा प्रकरणांचा याआधीही स्फोट झाला आहे. मात्र, शेवटपर्यंत ही प्रकरणे तडीस नेली जात नाहीत. अर्ध्यावरच या प्रकरणांचा विसर पडतो व पुन्हा नव्याने त्याचा उदय होतो. काही दिवस त्याला आळा बसल्यानंतर ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे ती पुन्हा सुरू होणार नाही असे सरकारही ठामपणे सांगू शकत नाही.∙∙∙

सरकारी नोकऱ्यांचा फुगा

राज्यात सरकारी नोकरीसाठी लाच दिल्याची आणि घेतल्याची अनेक प्रकरणे गाजत असून आज किती नव्या नावांची यादीत भर पडणार, कोणती नवी नावे समोर येणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे, पण अनेकजण असेही आहेत की ज्यांनी आपल्या नात्यातीलच काहीजणांकडे सरकारी नोकरीच्या आशेने पैसे दिले आहेत. परंतु त्यांच्याविषयी तक्रार दिल्यास त्यांच्यासोबत आपल्या नावाची बदनामी आणि जे पैसे देतो म्हणून सांगताहेत त्यांची पोलिसांत तक्रार केल्यास तेलही गेले अन् तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे अशी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेकजण तक्रारी करण्यास धजावत नाहीत. अनेकांनी तक्रारी केल्या असत्या, तर सरकारी नोकऱ्यांच्या घोटाळ्यांचा हा फुगा किती फुगला असता याची कल्पनाच करता आली नसती. हो की नाही? ∙∙∙

Khari Kujbuj
खरी कुजबुज: नोकऱ्या कोणाला मिळतात?

पोलिसांना मिळाले नवे काम

गोव्यात पोलिसांची संख्या कमी असल्याचे नेहमीच सांगितले जाते, पण ते कोणाला पटत नाही. कारण चुकार वाहनचालकांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांचा घोळकाच दिसतो हे सर्वांनाच दिसून येते व अनेकदा त्याबद्दल त्या खात्यावर टीकाही होते. पण हा मुद्दा आहे किनारी भागात हरवलेल्या लहान मुलांना शोधण्याची पोलिसांवर येऊन पडलेली नवी जबाबदारी. किनारी भागातील पोलिसांना त्यामुळे पर्यटक गर्दीच्या दिवसांत म्हणे भलतीच धावपळ करावी लागते. गेल्या काही दिवसात म्हणे अनेकदा हा अनुभव आला तो उत्तर गोव्यातील प्रसिध्द किनारपट्टीवर. देशी पर्यटकांसंदर्भात हे प्रकार घडलेले आहेत. या दिवसात गोव्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. बहुतेक पर्यटक कुटुंबीयांसह गोवा दौऱ्यावर आलेले आहेत. एरवी समुद्राचे दर्शन न झालेले गोव्यातील किनाऱ्यावर पाऊल ठेवताच देहभान विसरल्यासारखे चेकाळतात व त्यात सोबत असलेल्या लहान मुलांचा त्यांना विसर पडतो. पालकांचा हात सुटलेली लहान मुले हरवतात व आई वडील तर आकांत करतातच, तर मुलेही हरवल्याचे पाहून रडू लागतात. अखेर तक्रार पोलिसांत येते व त्यांची धावपळ उडते. बहुतेक प्रकरणातील मुले शोधून देण्याची जबाबदारी या यंत्रणेने पार पाडली आहे हे मात्र खरे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com