गोवा: राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी एक वेगळीच कल्पना केली आहे. अरब देशात ज्याप्रमाणे इंधन विकले जाते, त्याप्रमाणे भारताने पाणी विकले तर... अशी ही कल्पना आहे. आता त्यांचे म्हणणे तसे फोल नाही, असे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे. जिथे जे पिकते ते विकणे शक्य आहे. आता अरब देशात इंधन मिळते, त्यामुळे ते बिनधास्त विकतात. त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. आपल्याकडे इतर देशांपेक्षा भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून टंचाईग्रस्त भागात जर आपण हे पाणी विकले तर त्यातून नफा नाही का मिळणार. त्यामुळे कल्पना काही वाईट नाही, फक्त नियोजन तेवढे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया काहीजणांनी व्यक्त केल्या. ∙∙∙
इंधन वितरणासाठी वर्गवारी करा
राज्यात गरीब, अतिगरीब, साधारण, श्रीमंत अशा वर्गवारीने रेशन कार्डवर तांदूळ दिले जात आहे. आता पेट्रोल डिझेलसाठीही अशाच प्रकारे वर्गवारी करून इंधन वितरण केले तर बरंच होईल. त्यातही भाजपा भक्त, काँग्रेस, विरोधक अशीही वर्गवारी करावी. कारण पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळे आपला कमीपणा न दाखविता काही अंधभक्त पेट्रोल महाग झाले तरी चालेल, पण विरोध करणार नसल्याचे ठासून सांगतात अशा लोकांना श्रीमंत वर्गात घालावे. काँग्रेस, विरोधक आहे त्यांना बीपीएल वर्गात घालावे, जेणेकरून काही प्रमाणात स्वस्त पेट्रोल मिळेल. ज्यांना उमेद आहे त्यांनी श्रीमंत यादीतील पेट्रोल खरेदी करावे अशी मागणी वाहनचालकांकडून होऊ लागली आहे. ∙∙∙
रवींकडे मनोरंजन सोसायटी द्या!
‘चाय पिया, सामोसा खाया’फेम मंत्री रवी नाईक यांनी गोव्यातील पाणी आखाती देशात निर्यात करण्याची अफलातून योजना पुढे आणून गोवेकरांची बरीच करमणूक केली. सध्या तमाम गोवेकर वाढलेल्या इंधनाच्या किमतीपुढे हतबल झालेले असताना प्रमोद सावंत यांच्या सरकारातील एक मंत्री लोकांना पेट्रोल परवडत नाही, तर विजेवर चालणाऱ्या गाड्या विकत घ्या असे सांगून करमणूक करत असताना रवीबाब गोव्यातील पाणी निर्यात करण्याची भाषा करून आणखी एक विनोद करतात.
हे दोन्ही विनोद भाजप पक्षाच्या स्थापना दिनीच होतात हा तर सर्वात मोठा विनोद. सध्या लोक महागाईने त्रस्त झालेले असताना या असल्या विनोदांनी जर त्यांच्या तोंडावर हसू आणले तर ते बरेच झाले म्हणा. या रवी बाबाकडे गोवा मनोरंजन सोसायटी देण्याचा प्रमोदरावांनी आता गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. तसे झाल्यास लोकांचे मनोरंजन करण्यासाठी बाहेरून कलाकार आणण्याची गरजच पडणार नाही! प्रमोदराव करताय ना विचार? ∙∙∙
वर्षानुवर्षे केवळ इशारेच...
मडगावात भूगटार अर्थात मलनिस्सारण योजनेच्या कामाला चालना दिल्यास तीन दशके उलटून गेली, तरीही शहराचे सांडपाणी व मलमुत्र काही साळ नदीत व साळपे तळ्यात जाण्याचे बंद होत नाही. लोकांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ वा न्यायालयाने तंबी दिली की नगरपालिका वा अन्य यंत्रणा जाग्या होतात व या योजनेच्या जोडण्या न घेतलेल्या घरांच्या वा इमारतीच्या पाणी जोडण्या तोडण्याचे इशारे दिले जातात, पण अजून काही एकही जोडणी तोडलेली नाही. त्यामुळे सांडपाणी समस्या कायम आहे. ∙∙∙
भंडारी समाजाचा ‘एल्गार’
गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी मगोपला मंत्रिपद द्यायचे असेल, तर उत्तर गोव्यातून भंडारी समाजाचे आमदार जीत आरोलकर यांना ते पद द्यावे अशी मागणी केली आहे. अशोक नाईक हे भंडारी समाजाच्या अध्यक्षाबरोबर माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार व मंत्री रवी नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे जीत आरोलकरांना मंत्रिपद द्यावे ही मागणी करून ते मडकईचे आमदार सुदिन ढवळीकरांचा पत्ता कट करू पाहतात हे ओघाने आलेच.
त्यांचंही बरोबर आहे म्हणा. 2007 साली सुदिनांमुळेच रवींचा मुख्यमंत्रिपदाचा तोंडाकडे आलेला घास निसटला होता, तसेच 2012 साली रवी पराभूत झाल्यानंतर रवीच्या अंत्रूज शिमगोत्सव समितीकडून सुदिनांनीच शिमगोत्सवाचे आयोजन काढून घेतले होते हे अशोक नाईकच नव्हे, तर रवींचे इतर कार्यकर्तेही विसरलेले नाहीत. त्याचेच पडसाद अशोकांच्या या मागणीतून उमटत आहेत अशी प्रतिक्रिया फोंड्यातून व्यक्त होत आहे, पण केवळ अशोकांनीच नव्हे, तर गोमंतक बहुजन महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनीसुध्दा अशाच प्रकारची मागणी केली आहे. यातूनच भंडारी समाजाचा सुदिनाविरूध्दचा ‘एल्गार’ स्पष्ट होत आहे. शेवटी ‘आयज तुका तर फाल्या माका’ हेच खरे नव्हे का? ∙∙∙
फोंड्याच्या नगरसेवकाची ‘कमाल’
‘अजब है गोवा के लोग’ असे जे पंडित नेहरू गोमंतकीयांबाबत म्हणून गेले होते. त्याचा प्रत्यय आता फोंडा नगरपालिकेत यायला लागला आहे. आता परत एकदा विद्यमान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाविरुध्द अविश्वास ठराव आणून नगरसेवकांनी परत आपली ‘कमाल’ दाखविली आहे. यात सर्वात मजा म्हणजे काल नगराध्यक्षाबरोबर असलेले नगरसेवक आता नगराध्यक्षाविरुध्द गेले आहेत. त्यात काँग्रेसच्या एका नगरसेवकाचाही हा अविश्वास ठराव आणण्यात वाटा आहे. यामुळे फोंडा नगरपालिकेत कोणता नगरसेवक कोठे जाईल हे सांगणे ब्रह्मदेवालासुध्दा सांगणे शक्य नाही.
त्यामुळेच तर आतापर्यंत पाच नगराध्यक्ष झाले असून सहावा नगराध्यक्ष येण्याच्या वाटेवर आहे. या नगरसेवकांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतही अशीच ‘कमाल’ दाखविली होती. कोणकोणत्या उमेदवाराबरोबर आहे हे शेवटपर्यंत कळलेच नाही. एका पक्षाचा शेला पांघरून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत मार म्हणून सांगणे असे प्रकारही बऱ्याच नगरसेवकांनी केल्याचे आढळून आले आहे. याचीच चर्चा सध्या फोंड्यात रंगत असून नगरसेवकांचे हे ‘कारनामे’ बघून ‘मान गए उस्ताद’ असे म्हणत फोंड्यातील लोक या ‘बहाद्दरांना’ सलाम ठोकताहेत. ∙∙∙
आलेक्स अस्वस्थ
मंत्रिपद कधी मिळणार याकडे चातकासारखी वाट पाहणारे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना त्यांचे मित्र असलेले मुख्यमंत्री अजून पक्का शब्द देत नाहीत असे समजते. पहिल्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणारच याची खात्री असल्याने आलेक्सबाब अगदी सुटाबुटात श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पोहोचले होते, पण त्यावेळी त्यांच्या तोंडाला पानेच पुसली गेली. आता दरदिवशी भाजपात विजय येतो, दिगंबर येतो अशा वावड्या पसरू लागल्या असताना आपली मंत्री बनण्याची संधी कायमची हातची जाणार नाही ना या भीतीने सध्या आलेक्सना ग्रासले आहे. म्हणूनच आलेक्स सध्या अस्वस्थ आहेत असे त्यांचे जवळचे कार्यकर्तेच सांगू लागले आहेत. ∙∙∙
वाडी - तळावलीत पोस्टर युद्ध?
मडकई मतदारसंघातील वाडी - येथे महालक्ष्मी युवक संघातर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कृषिमंत्री रवी नाईक, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर व कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनंदनाचा पोस्टर लावला, पण कुणी तरी रात्रीच्यावेळी या पोस्टरवर शेण फेकून मारले. हा प्रकार लक्षात आल्यावर महालक्ष्मी संघाच्या कार्यकर्त्यांनी हे शेण धुऊन टाकले व त्याच रात्री हे पोस्टर फाडण्यात आले. हा प्रकार पाहून संतापलेल्या मडकईतील भाजपचे नेते सुदेश भिंगी यांनी नैतिकता म्हणून काही चीज शिल्लक आहे की नाही, असा सवाल करून रात्रीच्या अंधारात असले प्रकार का करता, हिंमत असेल तर दिवसा समोर या असे आव्हानच दिले आहे. आता तुम्हीच सांगा निवडणूक झाली, निकाल लागला, सरकार झाले, तरीपण मडकईसारख्या मतदारसंघात असे पोस्टर युद्ध खेळले जाते, त्याला आणखी काय म्हणावे..! ∙∙∙
नवे आमदार झाले सक्रिय
नव्याने निवडून आलेले आमोदार बरेच सक्रिय झालेले असून संबंधित मतदारसंघात ते बैठका घेऊन विविध कामांचा आढावा घेऊ लागल्याने तेथील अधिकाऱ्यांची तारांबळ उडताना दिसत आहे. यावेळी तब्बल साठ टक्के नवे चेहरे विधानसभेत पोचले आहेत व ते सगळेच उत्साहाने कामाला लागले आहेत. या उत्साहाचा फटका यापूर्वीच एका पंचायत सचिवाला बसलेला आहे. अशाप्रकारे सरकारी कार्यालयांकडेही त्यांनी मोर्चा वळविला तर तेथील कामचुकार वठणीवर येऊ शकतात. ∙∙∙
नेत्रावळीचा भाऊ लागला कामाला!
कशासाठी पोटासाठी... राजकारणाच्या मळावरती... असे म्हणणारे अनेकजण राजकारण हेच ब्रेड अँड बटर समजून राजकारणात येतात. आता लवकरच पंचायत निवडणुका होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी होण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील असाच एक भाऊ राजकारणी पंच सदस्य बनण्यासाठी झटत आहे. यापूर्वी भाऊ एकदा पंच सदस्य बनला होता, पंच सदस्य झाल्याने काय फायदा होतो हे भाऊला माहीत आहे. गेल्यावेळी भाऊला अभिजीतने पाडले होते. आता अभिजीत आमदारकीच्या निवडणुकीत हरल्यामुळे कदाचित पंचायत निवडणुकीत उतरणार नाही व त्याचा आपल्याला फायदा होणार असे गणित भाऊने केले आहे. नेत्रावळी जरी अतिदुर्गम भाग असला तरी तिथे आता मोठमोठी पंचतारांकीत हॉटेले आल्यामुळे माया भरपूर असणार हे भाऊ जाणतो म्हणूनच भाऊ पंच बनण्यासाठी धडपडत आहेत. पाहुया यंदा तरी भाऊ यशस्वी होतो की नाही. ∙∙∙
जे हरले त्यांनी दुकाने बंद केली!
तान लागली की विहीर खणाची अशी म्हण आहे. राजकारणी असेच वागतात. निवडणुका जवळ आल्या की त्यांना जनतेची आठवण होते. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर जनसेवेचे भूत बसते. गावागावांत कार्यालये उघडतात, मतदारांच्या घरी भेटी देतात. मात्र, निवडणुका झाल्या की त्यांना जनतेचा विसर पडतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत दहा उमेदवार रिगणात उतरले होते. त्यापैकी बहुतांश जणांनी आपले दुकान बंद केले. माजी आमदार क्लाफास यांनी आपले कार्यालय बंद केले. तृणमूलने कार्यालयाला टाळे ठोकले. सुदेश भिसे यांनी आपले कार्यालय बंद केले, आम आदमी पक्ष सोडून इतरांनी आपली दुकाने बंद केली. याला म्हणतात काम सरो वैद्य मरो. ∙∙∙
मडगावचा तरण तलाव
गेली अनेक वर्षे नूतनीकरणाच्या नावाखाली बंद केला गेलेला फातोर्डा येथील तरण तलाव नेमका कधी नूतनीकरण होऊन खुला होणार असा सवाल सासष्टीतील जलतरणप्रेमी आता करू लागले आहेत. लुसोफोनिया स्पर्धेसाठी फातोर्डा स्टेडियमबरोबरच या तरण तलावाचे नूतनीकरण करण्याची योजना आंखली गेली होती. त्याप्रमाणे स्टेडियमचे काम झाले, पण तरण तलावाचे काम रखडले. आता राष्ट्रीय स्पर्धेनिमित्ताने तरी ते हाती घेतले जाईल अशी आशा संबंधित बाळगून आहेत. ∙∙∙
माडेलात ये रे माझ्या मागल्या
माडेल येथील एसजीपीडीएचे घाऊक मासळी मार्केट या ना त्या कारणास्तव चर्चेत असते. या मार्केटबाहेरील रस्त्यावर चालणाऱ्या फेरीबाजाराचेही तसेच आहे. या बाजारामुळे त्या भागात नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत असतो. मडगाव नगरपालिकेचे अधिकारी तसेच फातोर्डा पोलिसांच्या कृपेवर हे सारे चालते असे आता सर्रास बोलले जात आहे. ∙∙∙
काँग्रेसचे कार्यकर्तेही नाराज
काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या दिगंबर कामत यांना काँग्रेसने विधिमंडळ नेतेपदही न देणे ही त्यांच्यासाठी अतिशय क्लेशदायक बाब आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत अचानक केलेले मोठे बदल कार्यकर्त्यांच्याही पचनी पडलेला नाही. नाराज झालेले नेते व कार्यकर्ते दुसऱ्या पर्यायाच्या तयारी असल्याची चर्चा सध्या काँग्रेस गोटातच सुरू झाली आहे.
रवींच्या विनोदावर जाऊ नका
माजी मुख्यमंत्री व विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर भलतेच चर्चेत आले आहेत. ‘चाय पिया, सामोसा खाया’ या विनोदानंतर त्यांनी आता गोव्याचे पाणी अरब देशात पाठविण्याचाही विनोद केला आहे. तसेच रवी नाईक हे विनोदी स्वभावाचे असले, तरी ते मुरब्बी राजकारणी आहेत हे विसरून चालणार नाही बरं का. आज फोंड्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपले मुरब्बी आणि अनुभवी राजकारण दाखवून दिले आहे. गोव्याच्या विकासात त्यांचा मोठा हात आहे, हे कदापिही विसरून चालणार नाही. आता भाजप सरकारात त्यांना कृषिमंत्री पद मिळाले आहे.
या पदाला न्याय देताना फोंडावासीयांना सातत्याने चांगले ते देण्याचा आपला प्रयत्न राहील अशीही ग्वाही देण्यास ते विसरले नाहीत. त्याचप्रमाणे गेले अनेक दिवस जो विषय मागे पडला होता तो समोर आणण्याचे त्यांनी आज सुतोवाच करून फोंडावासीयांना सुखद धक्का दिला आहे. तो विषय म्हणजे फोंड्याला तिसऱ्या जिल्ह्याचा दर्जा देणे. फोंड्याची तिसरा जिल्हा म्हणून निर्मिती करतानाच शहरात भूमिगत वीजावहिन्या टाकण्यासाठी बावीस कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहे व या भूमिगत वीजवाहिन्यांमुळे फोंडा शहर वीजवाहिन्यांच्या जंजाळातून मुक्त होईल हेही सांगण्यास ते विसरलेले नाहीत हेही नसे थोडके. त्यामुळे रवींना सगळ्याच बाबतीत हसण्यावर घेऊ नका. ∙∙∙
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.